आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

डॉ. आंबेडकरांनी पत नसलेल्या माणसाला ऐपत मिळवून दिली – प्रा. शरद मेढे

राजेंद्र देवढे । पाथर्डी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी, अस्पृश्यांचे पुढारी, संविधानाचे शिल्पकारच नव्हते तर देशातील शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी कामगार आणि महिलांचे उद्धारकर्तेही होते. त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या वडिलांच्या वारसाहक्कामध्ये मुलांच्या बरोबरीने अधिकार दिले. त्यांनी पत नसलेल्या माणसाला ऐपत मिळवून दिली असे प्रतिपादन श्री विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रा. शरद मेढे यांनी केले.

येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख, संपत घारे, डॉ.अशोक कानडे, डॉ.अशोक डोळस व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. मेढे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील विषमतावादी मूल्ये नष्ट करून देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायादी धर्मनिरपेक्ष मूल्ये दिली. तसेच कोणताही संघर्ष न करता महिलांना मतदानाचा हक्क दिला. जलनियोजनासंदर्भात त्यांनी घेतलेले निर्णय देशाला व कृषी क्षेत्राला आजही दिशादर्शक आहेत. कामगार मंत्री असताना त्यांनी महिला कामगारांसाठी केलेले कायदे महत्वाचे आहेत. एवढेच नव्हे तर एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी मांडलेल्या आर्थिक विचारातून देशाचे आर्थिक धोरण ठरविले जात आहे. बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत. म्हणूनच महाडच्या चवदार तळ्यावर केेेेलेल्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी ‘जय भवानी – जय शिवाजी’चा नारा दिला. माणसाला माणूस म्हणून जगू द्या यासाठी त्यांचा मंदिर प्रवेश सत्याग्रह होता. देशातील प्रत्येक नागरिक हा परमेश्वर आहे म्हणून त्यांनी संविधान देशातील नागरिकांना अर्पण केले. डॉ. अशोक डोळस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ अशोक कानडे यांनी आभार प्रदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी बोधीसत्व म्हणजे काय आणि संत कबीरांच्या विचारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर कसा प्रभाव होता, याविषयी विवेचन केले. कबीर पंथाच्या विचारांच्या प्रभावातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मानवतावादी मूल्यसंस्कार झाले असे ते शेवटी म्हणाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button