चांडक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

मलकापूर प्रतिनिधी :- नगर सेवा समिती संचालित ली. भॊ.चांडक विद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा जेष्ठ पत्रकार उल्हास शेगोकार, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. जयंत राजूरकर उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला आणि निबंध स्पर्धा ही या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरली . स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रेखाटने आणि निबंध सादर केले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात उल्हास शेगोकार यांनी संविधान दिनाचे महत्त्व विषद करताना असे सांगितले की,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे जगातील सर्वात मोठे, लिखित संविधान तयार झाले. भारतीय संविधानाने आपल्या देशाला लोकशाही, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व यासारखी मुल्ये दिली आहेत. संविधान हे केवळ कायद्यांचे दस्तऐवज नसून, ते समाज परिवर्तनाचे माध्यम आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी याची ग्वाही दिली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “आजच्या युवा पिढीने संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेऊन राष्ट्र उभारणीसाठी योगदान द्यावे. संविधानाचा आदर करताना आपले हक्क उपभोगा, पण त्याचबरोबर कर्तव्यांचीही पूर्तता करा.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांचे महत्व समजावून सांगितले,त्यांनी सांगितले की, “भारतीय संविधान हे जगभरातील लोकशाही देशांसाठी आदर्श आहे. आपण भारतीय म्हणून संविधानाच्या मूळ तत्त्वांवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे ही प्रतिपादन शेगोकार यांनी केले
कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. शिक्षक, विद्यार्थी आणि प्रमुख अतिथींनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे कला शिक्षक दीपक येउलकर यांनी केले.



