८५ किलो गोमांसासह २१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक, दोघे संशयित फरार

गोवंश मांस विक्रीविरोधात सावदा पोलिसांचा जबरदस्त दणका!
८५ किलो गोमांसासह २१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक, दोघे संशयित फरार
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद तायडे
रावेर तालुक्यातील लोहारा परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंशाची कत्तल करून मांस विक्री केल्याप्रकरणी सावदा पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून तब्बल ८५ किलो गोवंशाचे मांस, वजनकाटा, सुरा, कुऱ्हाड आणि रोख रक्कम असा एकूण २१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.२९ वाजेच्या सुमारास सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोहारा येथील गुल्ली लोहारा परिसरात सुकी नदीच्या काठावरील एका घराच्या आडोशाला गोवंशाचे मांस बाळगून त्याची विक्री केली जात आहे.
माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांसह सकाळी ६.५५ वाजता घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला रंगेहात पकडले. तर दुसरा आरोपी झाडाझुडपांचा आडोसा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.
तीन आरोपींचा सहभाग
या प्रकरणात सलीमखा महेमुदखा कुरेशी (वय ६६, रा. कसाईवाडा, रसलपूर, ता. रावेर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अकीलखा सलीमखा कुरेशी (रा. रसलपूर) हा फरार असून, घटनास्थळाचा मालक असलम शहादुर तडवी (रा. गुल्ली लोहारा) याचाही प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.
२१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून ८५ किलो गोवंशाचे मांस अंदाजे १७ हजार रुपये, एक सुपर क्वालिटी वजनकाटा ३ हजार रुपये, लोखंडी सुरा ५०० रुपये, लाकडी दांडा असलेली लोखंडी कुऱ्हाड ५०० रुपये आणि ९०० रुपये रोख असा एकूण २१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटनास्थळावरून मांसाचे नमुने तपासणीसाठी घेऊन ते सीलबंद करण्यात आले आहेत.
सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस हेड कॉन्स्टेबल मेहेरबान तडवी यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0242/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित २०१५) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अतुल तडवी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि गणेश फड, पोउनि राहुल सानप, श्रेणी पोउनि जयराम खोडपे, पोहेकॉ मेहेरबान तडवी, पोहेकॉ अतुल तडवी, पोहेकॉ निलेश बाविस्कर आणि चालक पोकॉ विकास जोशी यांच्या पथकाचा सहभाग होता.
बेकायदेशीर गोवंश मांस विक्रीविरोधात सावदा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.



