हिंगण्यात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथवाचन; उपस्थितांना मिलिंद वानखडे चे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
हिंगणा:- १ सप्टेंबर २०२६
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरू असलेल्या वर्षावासाच्या उपक्रमांतर्गत हिंगणा गावात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन व अभ्यास सुरू आहे. याच अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार सचिव आयु. मिलिंद वानखडे यांनी आज हिंगणा गावाला भेट देऊन ग्रंथवाचन कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी नमो बुद्धाय मित्र मंडळ तसेच सुजाता महिला मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिलिंद वानखडे यांनी उपस्थितांसमोर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन करून ग्रंथातील विषयांची सविस्तर फोड करून सांगितली. बुद्धांच्या विचारांचा, धम्माचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वैचारिक मार्गाचा अभ्यास करताना ग्रंथ समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत त्यांनी अतिशय सोप्या व प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले. दरम्यान, बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी मिलिंद वानखडे यांनी हिंगणा गावाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना ग्रंथाच्या अभ्यासासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर सौ. बबीता दिनेश उमाळे यांनी दिले. त्यांच्या अभ्यासपूर्ण उत्तराचे कौतुक करत यावेळी मिलिंद वानखडे यांनी सौ. बबीता उमाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र असलेले पुस्तक भेट देऊन त्यांचा गौरव केला. ग्रंथवाचनाच्या माध्यमातून समाजामध्ये बौद्ध धम्म, तथागत गौतम बुद्धांचे विचार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असून, हिंगणा गावातील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नियमित ग्रंथवाचन, प्रश्नोत्तर आणि अभ्यासपूर्ण चर्चेमुळे उपस्थितांमध्ये धम्मविषयक ज्ञान वाढण्यास मदत होत असल्याचे यावेळी दिसून आले. या ग्रंथवाचन कार्यक्रमात ग्रंथवाचक कुमारी पायल मुकिंदा गव्हांदे यांच्यासह बबीता उमाळे, नंदा चोपडे, रागिनी गव्हांदे, इंदुबाई उमाळे, रमाई गव्हांदे, मैना बाई गव्हांदे, तुळसाबाई चोपडे, जिजाबाई भटकर, तनु उमाळे, प्रियंका चोपडे, रतन भगत, मुकिंदा गव्हांदे, प्रणव गव्हांदे व यश वानखडे यांची उपस्थित होते.
हिंगणा गावात सुरू असलेल्या या ग्रंथवाचन उपक्रमामुळे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या अभ्यासातून वैचारिक प्रबोधनाची चळवळ अधिक बळकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.




