चिडीमार टवाळखोर आता धास्तावले, दामिनी पथक घेणार ॲक्शन, शिवसेना नेते कपिल खेडेकर यांचा पुढाकार ,, दामिनी पथकाची शहरात कोचिंग क्लासेस ला भेट, पथक करणार कार्यवाही…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली : शहरातील कोचिंग क्लासेस परिसरात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना बुलढाणा येथून विशेष दामिनी पथकाने शहरातील विविध कोचिंग क्लासेसना भेटी दिल्या व पाणी केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्या पुढाकारातून दामिनी पथकाने ही विशेष मोहीम राबविली. त्यामुळे क्लासेसच्या परिसरात मुलींचा पाठलाग, छेडछाड अथवा अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टवाळ खोरांची टवाळी आता थांबणार असून चिडीमार आता धास्तावले आहे .
डीपी रोड परिसरातील पारधी बाबा मंदिराजवळ मोठ्या संख्येने कोचिंग क्लासेस आहेत. या ठिकाणी विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते. दामिनी पथकातील अधिकाऱ्यांनी या परिसरातील विविध क्लासेसना भेटी देत संचालकांशी चर्चा केली. क्लासमध्ये येणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संचालकांना देण्यात आल्या. तसेच क्लासमधील आसनव्यवस्था, प्रवेश-निर्गमनाची व्यवस्था आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली.
दामिनी पथकाने केवळ डीपी रोड परिसरापुरती कारवाई मर्यादित न ठेवता चिखली शहरातील विविध भागांत भरणाऱ्या कोचिंग क्लासेसनाही भेटी दिल्या. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देतानाच क्लास परिसरात कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाकडून प्रतिबंधात्मक गस्त आणि जनजागृतीवरही भर दिला जात आहे.
चिडीमारांवर राहणार पोलिसांची करडी नजर
महिला व मुलींना छेडणे, पाठलाग करणे किंवा अश्लील शेरेबाजी करणे यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दामिनी पथक सक्रिय असते. शाळा – महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, बसस्थानके, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी पथकाकडून लक्ष ठेवले जाते. त्यामुळे आता शहरातील कोचिंग क्लासेस परिसरात मुलींचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या चिडीमारांची सुटका होणार नसल्याचा इशारा या कारवाईतून मिळाला आहे.
संकटात सापडलेल्या महिला किंवा मुलींनी तातडीने पोलिसांची मदत घ्यावी. महाराष्ट्रात आपत्कालीन पोलीस मदतीसाठी ११२ हा क्रमांक उपलब्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यात दामिनी पथकाशी संपर्क साधण्यासाठी ९८९०२७५०४०, तर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षासाठी ०७२६२-२४२४०० हा क्रमांक उपलब्ध आहे. दामिनी पथकाच्या या कारवाईमुळे शहरातील मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण निर्माण होणार आहे हे निश्चित.




