हार शाल श्रीफळ नको; शेतकऱ्यांसाठी मदत हवी! आमदार श्वेता महाले यांचे आवाहन….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस आवाज न्यायाचा
चिखली.तालुका.प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
शेतकरी दुष्काळात असताना सत्काराचा थाट नको; मुख्यमंत्री सहायता निधीला मदत द्या..
सध्या शेतकरी बांधव दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना अनावश्यक खर्च टाळून त्यातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आदर्श उपक्रम चिखली विधानसभा मतदारसंघात सुरू झाला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिक, गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केली आहे.
याच उपक्रमाला पुढे नेत मौजे हतेडी बु. येथे रविवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यातही अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे.
पांगरी ते हतेडी बु. या ७ किलोमीटर रस्त्याचे तब्बल ८ कोटी ५० लाख रुपये खर्चाचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार श्वेताताई महाले पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मात्र, सध्या शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असल्याने या सत्कारासाठी हार, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ यांसह फटाके, ढोल ताशे किंवा इतर कोणत्याही अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सत्कारासाठी खर्च होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. केवळ शब्दांनी स्वागत करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हातभार लावावा, अशी भूमिका आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मांडली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत केलेल्या या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे गणेशोत्सवातील उत्सवाचा आनंद कायम ठेवत शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.त्याच धर्तीवर हतेडी बु. येथील सत्कार सोहळ्यातही अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
परिसरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, शेतकरी व कष्टकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



