हरियाणातील सफाई कामगारांचे आंदोलन आणि सरकारची उदासीनता

हरियाणा राज्यात एकूण सफाई कामगार फक्त ३६००० च्या जवळपास आहेत . एकूण सफाई कामगारांत ९० टक्के कामगार वाल्मिकी समाजाचे आहेत . धानक , हेला , बाजिगर , महजबी शीख व काही अन्य जातीचे कामगार आहेत . बहुतांश सर्व कामगार अनुसूचित जातीचे आहेत . यात सरकारी कामगार ५००० असून उर्वरित कामगार ठेकेदारामार्फत लावण्यात आलेले अस्थाई स्वरूपाचे आहेत . नागरी आरोग्य चांगले राखणे , शहराची तसेच गावाची साफ - सफाई ठेवणे राज्याची जबाबदारी असताना सुद्धा हे काम ठेकेदारास सांगितले जाते . ठेकेदार ज्यांची नियुक्ती करतो त्यास हे काम करणे कमीपणाचे वाटते म्हणून तो दुसऱ्या कुणाला ते काम करायला लावतो व त्याच्या पगारातील काही रक्कम त्यास देत असतो . यामुळे खरे कामगार व लाभार्थी कामगार अशी विभागणी सर्वत्र झालेली आहे .
अलीकड हरियाणा सरकार तर्फे दरमहा १५००० रुपये पगार असणाऱ्या सफाई कामगार ( सार्वजनिक ठिकाणी झाडू मारणे , रस्त्यावर , इमारतीत स्वच्छ्ता करणे , झाडू मारणे , कचरा उचलणे ) भरती करिता अर्ज मागविण्यात आले असता पदवीधर , पदव्युत्तर असलेल्या ४६००० उमेदवारांनी अर्ज केले होते . या उमेदवारांची माहिती घेतली की लक्षात येते हरियाणात सुशिक्षित बेरोजगार तरुण किती मोठयाप्रमाणात असून ते एवढे ऊच्य शिक्षण घेऊन अवघ्या १५००० रुपयांवर साफसफाईचे काम करायला तयार आहेत . या वरून असेही दिसते की तिथल्या या एस. सी. समाजात उच्यशिक्षित अधिक आहेत . या उच्यशिक्षित तरुणांना ही नोकरी मिळाली की तो अन्य व्यक्तीकडून ही कामं करून घेणार , त्याला मिळणाऱ्या १५००० रुपयातून पाच - सहा हजार रुपये तो बदली कामगाराला देणार हे देखील दिसून येते . ठेकेदार सुद्धा प्रती कामगार जेवढी रक्कम शासनाकडून घेतो त्याच्या नीम्य रक्कम तो कामगाराला देतो . मंजूर कामगार पेक्षा कमी कामगार लाऊन काम करून घेतले जाते ते वेगळेच .
हरियाणा राज्यात नगरपालिका कर्मचारी संघ व इतर संघटना एकत्र येऊन सफाई कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत आली आहे . राज्य सरकार त्यांच्याकडं दुर्लक्ष करीत आले आहे . सर्व संघटनांनी अखेर ६ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत संप पुकारला . त्यांनी एकूण १४ मागण्या मागितल्या आहेत . काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
१) गेल्या अनेक वर्षांपासून ठेकेदारामार्फत लावण्यात आलेल्या सर्व सफाई कामगारांना नियमित करण्यात यावे .
२) सर्व सफाई कामगारांचे वेतन दरमहा २६००० ते ३०००० करण्यात यावे .
३) सर्व सफाई कामगारांना दरमहा २००० रुपये जोखीम भत्ता मंजूर करावा .
४) सर्व सफाई कामगारांना ई.एस.आय. , पी. एफ. , अपघाती विमा लागू करण्यात यावे .
५) सर्व सफाई कामगारांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे .
६) सेफ्टी ट्यांक साफ करताना मृत्यू आल्यास कुटुंबाला २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी .
सरकारने या संदर्भाने वेळोवेळी चर्चा करून काही मागण्या मान्य केल्या मात्र त्यावर संघटनेचे समाधान होत नसल्याने ९ सप्टेंबर पर्यंत संप सुरूच ठेवण्याचे जाहीर करण्यात आले . राज्य सरकारचा निषेध म्हणून सुमारे ५०० कामगारांनी मुंडण केले , आंदोलनाचा भाग म्हणून शहरातील कचरा न उचलणे व अन्य कुणाला उचलू न देणे असे अभियान राबविले , फरिदाबाद , हिस्सार या शहरातील नगरपालिका कार्यालयासमोर तसेच तिथल्या मंत्र्यांच्या घरासमोर कचरा आणून टाकला . या प्रकारामुळे संघर्ष वाढत गेला .
हरियाणा मधील गावात , शहरात रस्तोरस्ती कचरा वाढत गेल्याने सौंदर्यात घट झाली , वायू प्रदूषण वाढले , दुर्गंधी पसरली , जनतेचा रोष वाढला , लोक स्वताहून कचरा उचलू लागले तेंव्हा आंदोलक व जनता यांच्यात संघर्ष होऊ लागला या व इतर कारणांनी सरकारने आंदोलकांशी बोलणी सुरू केली काही मागण्या तात्काळ मान्य केल्या पण मुख्य मागण्यांना बगल दिली त्यामुळे आंदोलन सुरूच राहिले . कामगार ऐकत नाही म्हणून सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा अंतर्गत कामगारांना नोटिसा दिल्या . ५ सप्टेंबर पर्यंत विनाअट कामावर हजर होण्याविषयी सांगितले . कामावर हजर न झाल्यास सेवेतून बडतर्फ केले जाईल अशी ताकीद दिली . तडकाफडकी २४ कामगार बडतर्फ केले . असे असले तरी कामगार आपल्या आंदोलनावर ठाम असून संप व आंदोलन सुरूच ठेवले .
हिस्सार , झाज्जर , फरिदाबाद येथे कचरा उचलण्याकरिता पर्यायी गाड्या लावण्यात आल्या तेंव्हा आंदोलकांनी त्या गाड्या परतवून लावल्या . या प्रकरणाने सरकार अधिक चिडले व त्यांनी पोलिसांना आंदोलकांवर लाठी चार्ज करण्याचा आदेश दिला . पोलिसांनी बेछूट लाठी चार्ज केला , अनेकांना अटक केली . काही महिलांना पुरुष पोलिसांनी बेदम मारहाण केली . काही महिला आंदोलकांना अटक करून रात्रभर जेल मध्ये ठेवले , काही महिलांना रात्रीच्या वेळेस जंगलात सोडून दिले . आंदोलक पोलीस स्टेशन मधून , जंगला मधून परतून पुन्हा आंदोलनात सक्रिय होऊ लागले . यामुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले .
सफाई कामगारांचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे , यावर मोर्चे , निदर्शने , रास्तारोको सारखे आंदोलन सातत्याने सुरूच आहे . वेळोवेळी निवेदन देऊन , चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न हे कामगार करत आले मात्र सरकार त्यांना दाद देत नाही म्हणून त्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला . त्यांच्या या आंदोलनाला ‘ कचरा युद्ध ‘ म्हणून संबोधले जात आहे तर आंदोलक ‘ कचरा हेच आमचे शास्त्र ‘ म्हणून सांगू लागले . या प्रश्नाला सामाजिक , आर्थिक , राजकीय , जातीय अशा सर्वच बाजू आहेत . कम्युनिस्ट विचारसरणीची कामगार संघटना या चळवळीचे नेतृत्व करीत असल्याने सरकार ही ताकत वाढणार नाही याचा विचार करत आहे . आंदोलक विचारधारा न बघता कामगार एकजूट अबाधित राहील याचा विचार करत आहे . अखेर हा ज्वलंत प्रश्न कसा सोडविला जाईल ? हाच मुख्य मुद्दा आहे . तसे पाहिले तर सफाई कामगारांचा प्रश्न केवळ हरियाणा सीमित नाही . त्यांच्या सारखी अवस्था जवळ जवळ सर्वच राज्यात आहे . उद्या हा प्रश्न अन्य राज्यात निर्माण होणार नाही याचाही विचार हरियाणा सरकार करत असावे म्हणूनही हा प्रश्न सुटत नसावा अशी शंका येते .
लेखक …… जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक , जळगाव



