बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. ६ : बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पावसाने दडी मारलेल्या भागांमध्ये अनुकूल हवामान परिस्थिती असल्यास कृत्रिम पर्जन्य (Cloud Seeding) प्रयोग तातडीने राबविण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ५ सप्टेंबर रोजी ई-मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन पाठविले.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्याच्या कालावधीतील पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास पिकांसोबतच जलसाठे आणि भूजल पुनर्भरणावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर पाऊस न झाल्यास हातातोंडाशी आलेला पिकांचा घास शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अलीकडील साप्ताहिक पर्जन्यमान अहवालानुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी नोंदविण्यात आले आहे. तसेच उपलब्ध दैनंदिन हवामान नोंदीनुसार, बुलडाणा येथे २ ते ३ सप्टेंबरदरम्यानच्या २४ तासांत पावसाची नोंद झालेली नाही. ही परिस्थिती जिल्ह्यातील पावसाच्या तुटवड्याचे गांभीर्य दर्शवित असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर पारंपरिक उपाययोजनांसोबतच उपलब्ध आधुनिक वैज्ञानिक व तांत्रिक पर्यायांचाही तातडीने विचार करणे आवश्यक आहे. कृत्रिम पर्जन्य निर्मिती हा त्यापैकी एक संभाव्य पर्याय आहे. या प्रक्रियेत पाऊस पडण्याची निश्चित हमी नसली तरी विशिष्ट प्रकारचे ढग, पुरेशी आर्द्रता आणि अनुकूल वातावरणीय परिस्थिती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) तसेच संबंधित तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाची तांत्रिक व्यवहार्यता तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील सद्यस्थिती लक्षात घेता, काही भागांत अनुकूल ढग व वातावरणीय परिस्थिती उपलब्ध असल्यास बुलडाणा जिल्ह्यासह पावसाने दडी मारलेल्या विदर्भातील तसेच राज्यातील अन्य आवश्यक भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम पर्जन्य निर्मितीचा प्रयोग राबविण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील विविध भागांचा दौरा करून पिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांनी कृत्रिम पर्जन्य प्रयोगाबाबत राज्य शासनाकडे ही मागणी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button