सीबीएसईच्या नावाखाली पालकांची लाखोंची लूट? देऊळगाव राजातील शाळांवर गंभीर आरोप; शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :– शंकर शिवरकर
मान्यता नसतानाही ‘सीबीएसई’चा दावा करून प्रवेश प्रक्रिया? जादा शुल्क आकारून पालकांची दिशाभूल होत असल्याची जनतेत चर्चा
देऊळगाव राजा शहरात काही खासगी शाळांकडून सीबीएसई (CBSE) मान्यतेच्या नावाखाली पालकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. संबंधित शाळांकडे प्रत्यक्षात सीबीएसईची अधिकृत संलग्नता (Affiliation) नसतानाही स्वतःला सीबीएसई शाळा म्हणून सादर करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
माहितीनुसार, काही शाळांना केवळ राज्य मंडळाची (State Board) मान्यताअसतानाही त्या सी बी एस ई च्या नावाखाली प्रवेश प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप आहे. या माध्यमातून राज्य मंडळाच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट शुल्क आकारले जात असून हजारो रुपयांची अतिरिक्त फी पालकांकडून घेतली जात असल्याची तक्रार अनेक पालकांकडून व्यक्त होत आहे.शैक्षणिक वर्ष सुरू होताच पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शाळेचा शोध घेतात. याच विश्वासाचा गैरफायदा घेत काही संस्था सीबीएसईचे नाव पुढे करून आकर्षक जाहिराती, माहितीपत्रके आणि प्रचार करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, संबंधित शाळेकडे सीबीएसईची अधिकृत Affiliation आहे की नाही, याची पडताळणी अनेक पालक करत नसल्याने त्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, शहरात अनेक वर्षांपासून अशा प्रकारची परिस्थिती असल्याची चर्चा असतानाही शिक्षण विभागाने नेमकी किती तपासणी केली, किती शाळांवर कारवाई केली किंवा किती प्रकरणांमध्ये नोटिसा बजावल्या, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
काही नागरिकांनी तर शिक्षण विभागातील काही अधिकारी अशा प्रकारांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा होत असल्याचा दावा केला आहे. मात्र, या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची सीबीएसई संलग्नता (Affiliation Number), अधिकृत मान्यता आणि आवश्यक कागदपत्रे तपासूनच प्रवेश घ्यावा, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
देऊळगाव राजा शहरात जर कोणतीही शाळा सीबीएसईची अधिकृत मान्यता नसताना स्वतःला सीबीएसई शाळा म्हणून सादर करत असेल, तर संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे.



