सहा तासांत मिसिंग मुलाचा शोध; मुक्ताईनगर पोलिसांची तात्काळ कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा अवघ्या सहा तासांत शोध लावून मुक्ताईनगर पोलिसांनी तत्परतेचे उदाहरण घालून दिले आहे. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले असून शहरातही समाधान व्यक्त होत आहे.
दि. २ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारास जुने गाव, बंजारा वाडा येथील रहिवासी अरुण अशोक वाघ (वय ३३) हे घरातून बाहेर पडले होते. दुपारपर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी ३ मार्च रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. शहरातील विविध भागात चौकशी, मोबाईल लोकेशन तपासणी तसेच सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल राजेश चव्हाण, पोलीस नाईक सुरेश मेढे आणि पोलीस कॉन्स्टेबल खवले यांनी विशेष परिश्रम घेतले. अवघ्या सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संबंधित व्यक्तीचा सुरक्षित शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
सदर तरुण सुखरूप आढळून आल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी दाखविलेली तत्परता ही केवळ कर्तव्यपूर्ती नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करणारी आहे. मिसिंग प्रकरणांमध्ये वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन तातडीने कारवाई केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नागरिकांनीही अशा प्रसंगी विलंब न करता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.



