श्री व्यंकटेश महाविद्यालयात राज्यशास्त्र व इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन, ऐतिहासिक वस्तू संग्रह प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : श्री बालाजी संस्थान, देऊळगाव राजा द्वारा संचालित स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र आणि इतिहास अभ्यास मंडळांचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित ऐतिहासिक वस्तू, दुर्मीळ नाणी, प्राचीन कागदपत्रे व छायाचित्रांच्या प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे होते, तर उद्घाटक म्हणून यशवंत कनिष्ठ कला महाविद्यालय, दिग्रस बु. येथील प्रा. गोपाल राजेजाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. प्रा. डॉ. राजेंद्रसिंह देवरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडून अतिथी परिचय करून दिला. त्यानंतर राज्यशास्त्र व इतिहास अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी केली. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या ‘राजनीति’ व इतिहास विषयाच्या स्वराज्याचे शिलेदार या संकल्पनेवर आधारित ‘इतिहास मीमांसा ‘ या भित्तीपत्रकांचे विमोचन करण्यात आले.
उद्घाटनपर भाषणात प्रा. गोपाल राजेजाधव यांनी इतिहास, संविधान, लोकशाही व्यवस्था आणि समकालीन राजकीय घडामोडींचा विद्यार्थ्यांनी चिकित्सक अभ्यास करावा, असे आवाहन केले. इतिहास आणि राज्यशास्त्राचा स्पर्धा परीक्षांसह दैनंदिन जीवनातील परस्परसंबंध अधोरेखित करतानाच, आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक इतिहासाबाबत सजग असले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे यांनी आजची शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. अभ्यास मंडळांच्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचे व्यावहारिक ज्ञान समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनामुळे इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती मिळते, असे सांगत त्यांनी दोन्ही विभागांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ऐतिहासिक वस्तू संग्रह प्रदर्शनात प्राचीन व दुर्मिळ नाणी, महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि ऐतिहासिक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली. प्रदर्शनाला विद्यार्थी, प्राध्यापक व उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री राऊत हिने केले, तर आभार कु. अंजली मलवर हिने मानले. श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, अभ्यास मंडळ सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



