शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक;

जी डी रोकडे प्रतिनिधी..
उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना घेराव,निकृष्ट सोयाबीन बियाण्याप्रकरणी व युरिया व इतर खतांची साठवणूक करून चळ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदार कारवाईची मागणी.
खामगाव – खामगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या रवी उन्नती कंपनीच्या सोयाबीन बियाण्यामुळे,शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेंच युरिया व इतर खतांची साठवणूक करून चळ्या भावाने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याबाबत शिवसेना आक्रमक झाली असून उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तातडीने कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
चितोडा अंबिकापूर येथील शेतकरी सोपान अंबादास नागे यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी रवी उन्नती या वाणाचे २५ किलोच्या पाच बॅगा खामगाव येथील सरकी लाईनमधील विक्रेत्याकडून ७ मे २०२६ रोजी खरेदी केल्या होत्या. त्यानंतर २३ जून २०२६ रोजी गट क्रमांक १८३ मधील शेतात सर्व नियमांचे पालन करून पेरणी करण्यात आली. मात्र पेरणीनंतर आठ दिवस उलटूनही बियाण्याची उगवण अत्यंत कमी झाली किंवा अनेक ठिकाणी अजिबात झाली नसल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तक्रारीसोबत खरेदीचे बिल, बियाण्याच्या रिकाम्या पिशव्या व इतर आवश्यक कागदपत्रेही कृषी विभागाकडे सादर करण्यात आली आहेत. संबंधित शेताची तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, दोषी बियाणे कंपनी व विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच तालुक्यातील सर्व नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी,अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असताना प्रशासनाने केवळ कागदी कार्यवाही न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा दिला.
कृषी विभागाने तक्रारीची दखल घेत संबंधित शेताची पाहणी करून आवश्यक अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल, तसेच नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल अंधारे, उपजिल्हाप्रमुख गजानन धोरण, तालुकाप्रमुख राजेंद्र बघे,शहर प्रमुख चेतन ठोंबरे, युवा सेना शहर प्रमुख राहुल कळमकार,उपशहर प्रमुख भाऊ बीडकर,करण छापरवाल,श्याम गायकवाड,आशिष लांडगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.



