विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व पर्यावरण विषयक जागृतीसाठी प्राथमिक शिक्षकांनी सक्रिय व्हावे : मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी

जळगाव : शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता निर्माण करणे ही आजच्या काळातील मोठी गरज आहे. विद्यार्थ्यांना जंक फूडच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत त्यांच्यात आरोग्यदायी सवयी आणि पर्यावरणपूरक जीवनमूल्ये रुजविण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
जिल्हा परिषद जळगाव आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये जंक फूडबाबत जनजागृती आणि पर्यावरण रक्षणाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पुस्तिकांच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
या प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगावचे प्राचार्य डॉ अनिल झोपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी या पुस्तिका मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
कार्यक्रमात जंक फूडच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच प्लास्टिक पॅकेजिंगमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत जागृती निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. यावेळी आनंददायी इंग्रजी अध्यापन तसेच बंजारा बोलीभाषेची ओळख निर्माण करणारी पुस्तिका यांचेही प्रकाशन करण्यात आले. तयार करण्यात आलेल्या पुस्तिकांमध्ये विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण लेख, प्रबोधनात्मक संदेश तसेच शाळांमध्ये राबविता येतील असे विविध कृती कार्यक्रम सुचविण्यात आले आहेत.
कार्यक्रमादरम्यान पुस्तिका तयार करणाऱ्या संपादन मंडळातील सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी तर आभार शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ चंद्रकांत साळुंखे, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे,उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांसह जिल्हाभरातून सर्व केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये या पुस्तिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले.समारोपाला पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.
(प्रतिक्रिया)
शिक्षकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा
“विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, आरोग्य व शिक्षणाविषयीं जागरूकता निर्माण करून संवेदनशील विद्यार्थी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने या पुस्तिकांची निर्मिती करण्यात आलेली आहे.”
मीनल करनवाल IAS , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगाव
(प्रतिक्रिया)
संस्कारांची रुजवणूक महत्वाची
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून प्रस्तुत संदर्भ साहित्य विकसित केलेले आहे त्याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा जेणेकरून बालपणापासून रुजलेले संस्कार त्यांच्या आणि समाजाच्या पुढील भविष्यावर सुकर परिणाम करतील.
डॉ अनिल झोपे (प्राचार्य, डायट )



