वाचनामुळेच जीवनात प्रगल्भता येते!

(भिमराव परघरमोल)
तेल्हारा प्रतिनिधी–(दि. १६ ऑक्टोबर २०२४)
वाचनामुळे जीवनामध्ये प्रगल्भता येऊन जीवन पूर्णपणे बदलून जाते, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल (लेखक, व्याख्याता तसा अभ्यास फुले शाहू आंबेडकरी विचारधारा तेल्हारा) यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की, तेल्हारा इथून जवळच असलेल्या उकळी बु। येथील सद्गुरु अण्णा महाराज सार्वजनिक वाचनालयामध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून भिमराव परघरमोल, गजेंद्र सुलतान (शिक्षक), लतीफ भालेराव, सत्तार पटेल, पंकज गोमासे (ग्रंथपाल) हे होते.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भिमराव परघरमोल आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांसह अब्दुल कलाम यांचे जीवन सुद्धा केवळ वाचनामुळे बदलले. वाचनामुळे सत्य-असत, योग्य-अयोग्य, चांगलं-वाईट यांची समज येवून समाजामध्ये ताठ मानेने व शूर सैनिक म्हणून जगता येते. सुलतान सरांनी वाचन प्रेरणा दिल्याबद्दल म्हटले की, मोबाईल मुळे वाचन संस्कृती संपण्याच्या मार्गावर आहे. हा धोका ओळखून प्रत्येकाने जीवनाचा प्रत्येक क्षण वाचनाच्या कामी लावावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शुभम तायडे यांनी केले. कार्यक्रमाला पंकज गोमासे (ग्रंथपाल) वैभव क्षीरसागर, रोहित गिऱ्हे, स्वराज क्षीरसागर यांच्यासह काही महिला व विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती होती.



