वन्यप्राण्यांच्या धडकेतील अपघातग्रस्तांना दिलासा; आमदार एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या अपघातांना मिळणार नुकसानभरपाई; शासनाने कायदेशीर तरतूद स्पष्ट केली
संपादकीय मुंबई | प्रतिनिधीवन
विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या धडकेमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये वाहनचालकांचा मृत्यू अथवा गंभीर नुकसान झाल्यास आता शासनाच्या नुकसानभरपाईच्या तरतुदीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाच्या विषयावर विधानपरिषदेत आमदार एकनाथ खडसे यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.या प्रश्नाला उत्तर देताना वने मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, यापूर्वी अशा अपघातांसाठी स्वतंत्र अनुदान योजना अस्तित्वात नव्हती. मात्र, वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या हानी, इजा व मालमत्तेच्या नुकसानीबाबत नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.यासाठी ‘महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा, नुकसान भरपाई याकरीता नुकसान भरपाई प्रदान करणे अधिनियम, २०२३’ अंतर्गत अधिसूचना ३० जानेवारी २०२४ रोजी जारी करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वन्यप्राण्यांच्या धडकेमुळे अपघातग्रस्त झालेल्या वाहनचालकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद उपलब्ध झाली आहे.राज्यातील वनक्षेत्रातून जाणाऱ्या महामार्ग व ग्रामीण रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या वावरामुळे अपघातांच्या घटना वाढत असताना, या विषयावर आमदार एकनाथ खडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शासनाने कायदेशीर चौकट स्पष्ट केल्याने भविष्यात अपघातग्रस्त वाहनचालकांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



