वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला हिवरखेड येथे अभूतपूर्व प्रतिसाद.

हिवरखेड (वार्ताहर )
दिल्ली येथे जंतर मंतर वर सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलक विध्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आवाहनाला हिवरखेड येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अगदी छोट्या छोट्या चहाच्या टपऱ्या, भाजीपाला विक्रेते,पानपट्टी पासून तर मोठमोठया किराणा व कापड दुकानदारांनी सुद्धा या बंद मध्ये सहभागी होऊन जंतर मंतर वरील जखमी विध्यार्थ्यांप्रति आपल्या संवेदना या बंदच्या माध्यमातून व्यक्त केल्या. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते सुनिल इंगळे, नरेश बांगर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्व व्यापारी बंधूना शांततापूर्ण व नम्रपणे निवेदन देऊन या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्याला हिवरखेड येथील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन प्रतिसाद दिला. या बंदचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक संस्था सुद्धा बंद होत्या. पालकांनी शाळेतून आपल्या पाल्याला परत बोलावले.हिवरखेडच्या नेहमी गजबजलेल्या असलेल्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. काही विध्यार्थी व विध्यार्थिनींनी जंतर मंतर वर विध्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी बाबत तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त करून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. अशा प्रकारचा बंद हिवरखेड मध्ये कित्येक वर्षानंतर अनुभवत असल्याची नागरिकात चर्चा आहे. बंद दरम्यान हिवरखेडचे ठाणेदार सचिन पाटील यांनी सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवला.
प्रतिक्रिया.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार आम्ही हिवरखेड येथील सर्व व्यावसायिकांना स्वयंस्फूर्तीने आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले याला सर्व व्यापारी बंधू आणि शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा.
सुनिल इंगळे, सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती.




