
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हादे जळगाव जामोद
नांदुरा:- २९ एप्रिल २०२६
नांदुरा तालुक्यातील ग्रामीण भागात राहून, कोणतीही खासगी ट्युशन न लावता मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर कुमारी अनुष्का उमेश तायडे हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या अनुष्काने बुलढाणा जिल्हा स्तरावरील परीक्षेत 180 पैकी 114 गुण मिळवून यश संपादन केले. अनुष्का ही एका अपंग व्यक्तीची मुलगी असून अत्यंत साध्या परिस्थितीत खेड्यात राहून तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे. जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची आवड यामुळे तिने अनेक विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल चुन्नीलाल न्शिवरतन कोठारी हायस्कूलच्या शिक्षकांनी अनुष्काच्या घरी जाऊन तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला. यावेळी शिक्षकवृंदांनी तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी शाळेतील शिक्षिका शितल डोके मॅडम, वर्षा कुलकर्णी मॅडम तसेच प्रकाश पवार सर, नरेंद्र डोंगरे सर आणि इतर शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. अनुष्का उमेश तायडे हिच्या या यशामुळे नांदुरा तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे……✍️



