नायगाव–किनगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वाड्यात शिरून वासराचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | दि. २२ जानेवारी २०२६यावल तालुक्यातील नायगाव–किनगाव परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, गुरुवारी (दि. २२ जानेवारी २०२६) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट वाड्यात प्रवेश करून एका लहान वासरावर हल्ला करत त्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना प्रसाद धर्माधिकारी महाराज यांच्या वाड्यात घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने वाड्यात प्रवेश केला. अवघ्या काही क्षणांत त्याने वासरावर झडप घालून त्याला ठार केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक शेतकरी आपल्या जनावरांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत असून, रात्रीच्या वेळी शेतात जाणेही धोकादायक झाले आहे.या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहेत. मात्र, यावल वनपरिक्षेत्र अधिकारी व वन विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. घटनेनंतरही तत्काळ ठोस उपाययोजना, पिंजरे लावणे, गस्त वाढवणे किंवा जनजागृती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.नायगाव–किनगाव परिसर हा शेतीप्रधान भाग असून अनेक कुटुंबे पशुपालनावर अवलंबून आहेत. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय जीवितहानीचीही भीती निर्माण झाली आहे. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.दरम्यान, वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरे बसवावेत, रात्रगस्त वाढवावी तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.



