स्मशानभूमीची समस्या कायमस्वरूपी सोडवा; अन्यथा आत्मदहन इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव तालुक्यातील कनारखेड येथील स्मशानभूमीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयात २६ जानेवारी २०२६ रोजी आत्मदहन करू असा इशारा कनारखेड येथील रहिवाशी महिलांनी एका पत्राद्वारे दिला आहे.
उपरोक्त विषयासंदर्भात खामगाव उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, कनारखेड गावाची लोकसंख्या ८०० च्या वर आहे. असे असताना गावालगत स्मशानभुमी नसल्यामुळे
गावातील मयत व्यक्तीला अंत्यविधीसाठी गावापासून ४ कि मी अंतरावर न्यावे लागते ज्याचा त्रास या गावातील नागरिकांना सहन करावा लागतो.
त्या अनुषंगाने शासकीय स्तरावरील अधिकारी व राजकीय स्तरावरील लोकप्रतिनिधींना या मागणीबाबत मागील तीन वर्षांपासून निवेदन देवून पाठपुरावा केला जात आहे. मात्र अजुनही समस्या दुर्लक्षित आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी शेगाव तहसीलदार, शेगाव पं. स. गटविकास अधिकारी, व
ग्रामसेविका यांनी प्रत्यक्ष गावात येऊन पाहणी केली. मात्र त्यानंतर पुढे काहीही झाले नाही.
तरी पुढील ४ दिवसाच्या आत यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा २६ जानेवारी, गणराज्य दिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता देवलाल दिनकर वाकोडे यांच्यासह कनारखेड येथील रहिवासी महिलांच्या स्वाक्षन्या आहेत.



