एल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड; नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना उपाययोजनांचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. २७ : खरीप हंगाम २०२६ मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या अनियमित पावसाच्या परिस्थितीत पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सन २०२६ च्या नैऋत्य मोसमी हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत देशातील पर्जन्यमान सामान्य सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. एल निनोच्या परिणामामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाचे आगमन व वितरण अनियमित झाल्याने पेरण्यांना विलंब झाला. मात्र, माहे जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे परिस्थितीत सुधारणा होऊन जिल्ह्यात एकूण ७ लाख २५ हजार २२९.७ हेक्टर क्षेत्रावर, म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या ९८.३९ टक्के पेरणी झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाने पुन्हा ओढ दिल्याने खरीप पिकांवर ताण निर्माण झाला असून, बहुतांश तालुक्यांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत पावसात खंड पडल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
पिकांवरील ताण कमी करण्यासाठी उपाय
जमिनीतील ओलावा टिकविणे : जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) करावे. पेरणी केलेल्या पिकांमध्ये कोळपणी करून पिकास मातीची भर द्यावी. पिकांच्या अंतरातून होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी खालील भागातील पाने कमी करावीत. शेताच्या बांधावर वारा प्रतिबंधकांचा वापर करावा.
पाण्याचे योग्य व्यवस्थापन : संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी पिकांना पाणी द्यावे. ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे सुमारे ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होऊ शकते. शेततळे व साठवण बंधाऱ्यातील पाणी संरक्षित सिंचनासाठी वापरावा. तसेच पिकांमध्ये तण नियंत्रण तसेच आंतरमशागत करावी.
पिकांवरील ताण कमी करण्यासाठी फवारणी : पावसाचा ताण पडल्यानंतर २ टक्के युरिया, डीएपी किंवा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
मृद व जलसंधारण : पिकांमध्ये जलसंधारणाच्या संरचना उभाराव्यात. पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरविण्यासाठी शेततळे, नाले तसेच माती अथवा सिमेंट बंधाऱ्यांचा वापर करावा.
भाजीपाला पिकांसाठी उपाय : लहान रोपांना सावली करावी, तण काढून आंतरमशागत करावी. ठिबक सिंचनाचा वापर करावा, प्लास्टिक मल्चिंग करावे तसेच अनावश्यक खतांचा वापर टाळावा.
फळबागांचे संरक्षण : झाडांच्या बुंध्याभोवती गवत व पालापाचोळा टाकून आच्छादन करावे. पाण्याचा ताण कमी करण्यासाठी केओलिन ८ टक्के किंवा पोटॅशियम नायट्रेट २ टक्के फवारणी करावी. १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी तसेच खोडांना १० टक्के बोर्डोपेस्ट लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कीड-रोग व्यवस्थापन : पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी. पक्षीथांबे, चिकट सापळे व मित्र किटकांचे संवर्धन व वापर याबाबत जनजागृती करावी. हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन, शेंडी गोगलगाय निर्मूलन व बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबतही जनजागृती मोहीम राबवावी.
हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांच्या पावसाचा अंदाज दिला जातो. शेतकऱ्यांनी या अंदाजाची माहिती घेऊन त्यानुसार शेतीतील कामांचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.



