जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीय

मुक्ताईनगर बसस्थानकातील अव्यवस्था; प्लॅटफॉर्म बदलामुळे अपंग व ज्येष्ठ प्रवाशांचे हाल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर बसस्थानकातील अव्यवस्था; प्लॅटफॉर्म बदलामुळे अपंग व ज्येष्ठ प्रवाशांचे हाल

मुक्ताईनगर, प्रतिनिधी :
मुक्ताईनगर बसस्थानकातील व्यवस्थापनाबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून नियोजित प्लॅटफॉर्मवर बस न लावण्याच्या प्रकारामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. वारंवार प्लॅटफॉर्म बदलले जात असल्याने प्रवाशांना बस शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असून यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक त्रासदायक ठरत आहे.

मुक्ताईनगर हे श्री संत आई मुक्ताई मंदिरामुळे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र मानले जाते. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात. याशिवाय शहरात विविध महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृषी विद्यालय तसेच अनेक खाजगी शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांची आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत बसस्थानकातील शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थापन अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे दिसून येत आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, काही एसटी फेऱ्या कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याने अनेकांना तासन्तास बसस्थानकात प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच नियोजित ‘क्यू’ प्लॅटफॉर्मवर बस न लावता इतरत्र उभ्या केल्या जात असल्याने विशेषतः अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना सामानासह एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर धाव घ्यावी लागत आहे. अनेकदा बस सुटण्याच्या घाईत प्रवाशांची तारांबळ उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

यामुळे सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसमध्ये चढताना किंवा गर्दीच्या वेळी पाकीटमारी, मोबाईल चोरी, मंगळसूत्र चोरी यांसारख्या घटना घडल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. नियोजित ठिकाणी बस न लागल्यास सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभाव कमी होतो आणि संशयितांची ओळख पटविणे पोलिसांसाठीही कठीण ठरते, अशी भावना काही प्रवाशांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून दूरध्वनीद्वारे तक्रारीही करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप होत आहे.

प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज

मुक्ताईनगरसारख्या धार्मिक व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रातील बसस्थानकात प्रवाशांना मूलभूत सुविधा, स्पष्ट सूचना प्रणाली आणि नियोजित प्लॅटफॉर्म व्यवस्थापन उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विशेषतः दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या सोयीचा विचार करून बसचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रवाशांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन बसस्थानकातील व्यवस्थापन सुधारावे, अन्यथा संतापाचे रूपांतर आंदोलनात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button