मुक्ताईनगर तालुक्यातील ११ पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी; आमदार खडसेंच्या पाठपुराव्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे लेखी उत्तर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी.
मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव, कोऱ्हाळा, पिंप्राळा, नांदवेल, महालखेडा, थेरोळा, बोदवड, निमखेडी बु., इच्छापूर, घोडसगाव येथील पूरग्रस्त भाग आणि मुक्ताईनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर अशा एकूण ११ ठिकाणच्या नदीकाठावरील पुनर्वसित गावांचे सन १९५९ मध्ये महापुरानंतर स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, या स्थलांतरित गावांमधील आणि पूरग्रस्त भागातील नोंदी भूमी अभिलेख विभागाकडे उपलब्ध नसल्यामुळे रहिवाशांना सातबारा उताऱ्यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर, आमदार एकनाथ खडसे यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित करून या गावांच्या व भागांच्या जमिनीच्या नोंदी भूमी अभिलेख विभागाकडे करण्याबाबत आणि नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे विचारणा केली होती.
यावर मदत व पुनर्वसन मंत्री यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, मुक्ताईनगर तालुक्यातील संबंधित गावांचे शेती आणि गावठाणाचे सातबारा उपलब्ध आहेत. त्यांनी अधिक माहिती देताना नमूद केले की, ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील या गावठाणांचे ड्रोनद्वारे मोजमाप करून सर्व मिळकतदारांना कायदेशीर सनद किंवा प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्वामित्व’ योजना राबवण्यात येत आहे. सध्या मुक्ताईनगर तालुक्यातील या गावातील आणि शहरातील पूरग्रस्त भागातील मिळकतदारांना स्वामित्व योजनेच्या माध्यमातून कायदेशीर सनद व प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.



