क्राईमखानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्र

मुक्ताईनगरात वॉचमनला ढाबा मालकाची कथित निर्घृण मारहाण; मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

हक्काचा पगार मागणे हा गुन्हा आहे का? मेहनतीचा मोबदला मागितल्यामुळे एका कामगाराला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा शिवारात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. थकीत वेतनाची मागणी केल्याच्या रागातून ढाबा मालकाने वॉचमनला निर्घृणपणे लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कामगारांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांच्या हक्कांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

माहितीनुसार, गोकूळ तारासिंग जाधव (वय ५०, रा. निंभोरा, ता. रावेर, जि. जळगाव) हे बुरहानपूर महामार्गावरील उचंदा शिवारातील ‘शेर-ए-पंजाब’ ढाब्यावर मागील पाच महिन्यांपासून वॉचमन म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नी सुमित्राबाई जाधव या त्याच ठिकाणी पोळ्या बनवण्याचे काम करत होत्या. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दोघांच्याही मेहनतीचा मोबदला थकविण्यात आल्याचा आरोप आहे.

१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर गोकूळ जाधव यांनी आपल्या हक्काच्या पगाराची मागणी ढाबा मालक कमलजीतसिंग प्रितमसिंग याच्याकडे केली. याचाच राग मनात धरून आरोपीने त्यांना रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गॅरेजमध्ये नेले आणि लाकडी काठीने डोक्यावर वार करत रक्ताच्या थारोळ्यात पाडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. एवढ्यावरही न थांबता जखमी अवस्थेत त्यांना मदत करण्याऐवजी आरोपी पुन्हा ढाब्यावर येऊन बसल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पत्नी सुमित्राबाई जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पतीला प्रथम भुसावळ आणि त्यानंतर बुरहानपूर जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मृत्यूशी झुंज देत असताना २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजता गोकूळ जाधव यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी सुमित्राबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपी कमलजीतसिंग प्रितमसिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येची नाही, तर श्रमिकांच्या सन्मानावर झालेला गंभीर आघात आहे. मेहनतीचा हक्काचा मोबदला मागणाऱ्या कामगाराला हिंसाचाराने गप्प करण्याचा प्रयत्न झाला असेल, तर ही बाब अत्यंत संतापजनक आहे. अशा प्रवृत्तीवर कठोर कायदेशीर कारवाई होणे हीच समाजाची अपेक्षा असून, दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे. अन्यथा, कामगारांच्या हक्कांवरील विश्वास आणखी डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button