खानदेशजळगावजळगावा जिल्हामहाराष्ट्र

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोहेकाँ महेश चौधरी लाच मागणी प्रकरणात निलंबित

जळगाव, ३० सप्टेंबर २०२६ : भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे नेमणूक असलेले पोलीस हवालदार / पोहेकाँ १५३९ महेश एकनाथ चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत गंभीर बाबी निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी आज निलंबित केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी पंचांसमक्ष केलेल्या मागणी पडताळणीत पोहेकाँ महेश चौधरी यांच्याविरुद्ध गंभीर बाबी समोर आल्या.
सदर पडताळणीनुसार, खाजगी इसम अमन सनसोये याने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. १३९/२०२६ या प्रकरणात आरोपीस अटक न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे तडजोडीअंती २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे संभाषणातून निष्पन्न झाले. ही मागणी पोहेकाँ महेश चौधरी यांच्यासाठीच असल्याचे स्पष्ट झाले. रक्कम प्रत्यक्ष स्वीकारली गेली नसली तरी ३ ऑगस्ट २०२६ रोजीची मागणी पडताळणी, पंचांचे कथन, तक्रारदाराचा जबाब आणि डिजिटल व्हॉइस रेकॉर्डरवरील ध्वनीमुद्रित संभाषण हे पुरावे उपलब्ध आहेत. या प्रकरणी खाजगी इसम अमन सनसोये यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७अ अन्वये भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदेशात पुढे म्हटले आहे की, पोहेकाँ महेश एकनाथ चौधरी यांचे वर्तन बेजबाबदार आणि बेशिस्त स्वरूपाचे आहे. त्यांच्या वर्तनामुळे शिस्तप्रिय पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसात डागाळली आहे. त्यांनी वरिष्ठांच्या सूचना आणि आदेशांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. जबाबदार पोलीस अंमलदार असूनही खाजगी इसमामार्फत लाचेची मागणी करणे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे बेशिस्त वर्तन असून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियम ३ चे उल्लंघन केले आहे. प्रथमदर्शनी हे वर्तन अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे पोलीस अधीक्षकांना पूर्ण खात्री पटली आहे.
त्याअर्थी महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ मधील नियम ३ (१-अ) (एक) (अ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोहेकाँ १५३९ महेश एकनाथ चौधरी यांना आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून प्राथमिक चौकशी, विभागीय चौकशी आणि त्याअनुषंगाने होणाऱ्या कारवाईच्या अधीन राहून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव हे राहील. त्यांनी पोलीस मुख्यालय जळगाव येथे सर्व शासकीय किट-संरंजाम जमा करावा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय निलंबन काळात मुख्यालय सोडून इतरत्र जाता येणार नाही. दररोज सकाळी आणि संध्याकाळी राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल.
निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधि, स्वीकृत सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे या काळातील प्रदाने) नियम १९८१ मधील नियम ६८ अन्वये निर्वाह भत्ता देण्यात येईल. तसेच महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक डीआरएस-१०८१/सीआर-८७७/एसईआर-८, दिनांक १० डिसेंबर १९८१ मधील तरतुदीनुसार निर्वाह भत्त्याच्या दराचे पुनर्विलोकन करण्यात येईल.

निलंबन काळात कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी किंवा व्यवसाय केल्यास ती कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियम १६ अन्वये गैरवर्तणूक समजली जाईल आणि शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील. तसेच अनुज्ञेय निर्वाह भत्ताही गमवावा लागेल.
हा आदेश प्रभारी अधिकारी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांच्यामार्फत संबंधित पोहेकाँ यांना देण्यात आला असून त्यांची दिनांकित स्वाक्षरी घेऊन दुय्यम प्रत तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांना निलंबन हजेरीबाबत आणि निर्वाह भत्त्याबाबत अहवाल सादर करण्याचेही आदेश आहेत.
या प्रकरणात आता प्राथमिक आणि विभागीय चौकशी सुरू होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button