पीक कर्जवाटपासाठी जिल्हा बँकेच्या आदेशाची प्रतीक्षा

सिंदखेड राजा मतदारसंघातील शेतकरी संभ्रमात; मुख्य कार्यालयाच्या निर्देशांकडे लक्ष
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत सातत्याने विचारणा केली जात आहे. मात्र, अद्याप मुख्य कार्यालयाकडून पीक कर्जवाटपाबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
पीक कर्जाबाबत माहिती घेण्यासाठी शाखेत येणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्य कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्जवाटपासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
मुख्य कार्यालयाकडून आदेश नेमका कधी प्राप्त होईल आणि त्यानंतर तालुक्यातील शाखांमधून पीक कर्जवाटपाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होईल, याबाबत सध्या निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.
दरम्यान, खरीप हंगामातील शेतीच्या खर्चासाठी पीक कर्जाची आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून मिळणाऱ्या आदेशाकडे लागले आहे.



