भुसावळमध्ये अग्नितांडवामुळे झालेल्या नुकसानीची मंत्री संजय सावकारे यांची पाहणी….!

भुसावळ, जि. जळगाव (प्रतिनिधी):
भुसावळ शहरातील पापा नगर व काजी प्लॉट परिसरात लागलेल्या भीषण आगीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग काही क्षणांतच भडकली आणि आसपासच्या घरांपर्यंत पोहोचली. या घटनेत काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पापा नगर परिसरातील एका घराला लागलेली आग अल्पावधीतच रौद्ररूप धारण करत शेजारील दोन घरांपर्यंत पसरली. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी तातडीने बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. गजबजलेल्या वस्तीत अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन ते चार बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने आणि शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत चौकशी सुरू आहे. घटनेनंतर राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी बाधित कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने मदत पुरविण्याचे निर्देश दिले.
या दुर्घटनेत बाधित कुटुंबांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, अग्निशमन दलाच्या कार्याचेही मंत्री सावकारे यांनी विशेष कौतुक केले.



