बुलढाणामहाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यात तरुणांचा अनोखा प्रयोग ;उष्ण हवामानात स्ट्रॉबेरी शेतीत यश….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:-मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

बुलढाणा : महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतली जाणारी स्ट्रॉबेरी शेती आता विदर्भातही शक्य असल्याचे बुलढाणा जिल्ह्यातील काही तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पारंपरिक पिकांऐवजी वेगळा प्रयोग करत बुलढाणा शहराजवळील शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करून त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या शेतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बुलढाणा येथील विजय उबाळे, राम वाघ, राम सारोडे आणि ऋत्विक जाटकर या चार तरुणांनी एकत्र येत स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केला. या तरुणांपैकी विजय उबाळे यांनी कृषी पदवी व एमबीए शिक्षण घेतले आहे, तर राम वाघ हे वनस्पतीशास्त्र विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. राम सारोडे हे सिव्हिल इंजिनिअर असून ऋत्विक जाटकर हेही प्रगतशील शेतकरी आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी स्ट्रॉबेरीचे पीक घेतले. महाबळेश्वर येथून उच्च दर्जाची रोपे आणून नोव्हेंबर 2025 मध्ये सुमारे 4 एकर क्षेत्रात लागवड करण्यात आली.
लागवडीनंतर ठिबक सिंचन, मल्चिंग आणि योग्य खत व्यवस्थापनाचा वापर करण्यात आला. उष्ण हवामानामुळे सुरुवातीला अनेकांना हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याबाबत शंका होती. मात्र शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि योग्य नियोजनामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला.
लागवडीनंतर जानेवारी 2026 पासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले. आणि आता मार्चमध्ये स्ट्रॉबेरीची पिक पूर्ण झाले.लाल, ताज्या आणि गोड चवीच्या स्ट्रॉबेरीला स्थानिक बाजारात चांगली मागणी मिळत आहे. व्यापारी, हॉटेल व बेकरी व्यवसायिकांकडूनही या स्ट्रॉबेरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या प्रयोगामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांबरोबरच उच्च मूल्य असलेल्या पिकांकडे वळण्याची नवी दिशा मिळाली आहे. अनेक शेतकरी या शेताला भेट देऊन स्ट्रॉबेरी शेतीबाबत माहिती घेत आहेत.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगळे पीक घेण्याचा हा प्रयत्न जिल्ह्यातील शेती क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यात आणखी शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button