बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा; आमदार मनोज कायंदे यांची कृषीमंत्र्यांकडे अकोल्यातील बैठकीत ठाम मागणी

चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आणि शेतकऱ्यांना दिवसा ८ तास अखंडित वीज देण्याचीही केली मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा:बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती पाहता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी ठाम मागणी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी केली. अकोला येथे आयोजित अमरावती विभागीय पीक परिस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात रविवारी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत अमरावती विभागातील पीक परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी
बैठकीत बोलताना आमदार मनोज कायंदे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थिती कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. “बुलढाणा जिल्हा दुष्काळ यादीतून वगळल्याची खोटी अफवा काही घटकांकडून पसरवली जात असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशा खोट्या अफवा पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
शेतकऱ्यांसाठी विविध मागण्यांचे निवेदनआमदार कायंदे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघ आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी बैठकीत प्रामुख्याने खालील मागण्या मांडल्या:
दिवसा ८ तास वीजपुरवठा: सध्याच्या संकटकाळात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा अखंडित ८ तास वीजपुरवठा करण्यात यावा.
चाऱ्याची व्यवस्था: दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात उद्भवू शकणारी टंचाई लक्षात घेता, जनावरांसाठी आत्तापासूनच पुरेशा चाऱ्याची व्यवस्था शासनाने करावी.
सरसकट मदत: पिकांच्या झालेल्या नुकसानीची दाहकता पाहता, शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सरसकट मदतीबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा.
शेतकरी हितासाठी पाठपुरावा सुरूच राहणार
“सिंदखेडराजा मतदारसंघातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहे. त्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या असून, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळेपर्यंत आमचा सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि हक्कासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” असा विश्वास आमदार मनोज कायंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.



