महाराष्ट्र

पॉर्न वेबसाइटचा क्यूआर कोड चिकटवणारे तिघे अटकेत; तीन दिवसांची पोलिस कोठडी.

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस
वाशिम प्रतिनिधी:
श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम असलेल्या गणेशोत्सवात वाशिम शहरातील काळे फेल परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात स्थापित गणेशमूर्तीच्या पायथ्याशी पॉर्न वेबसाईटची टेलिग्रामसोबत लिंक असलेला क्यूआर कोड चिकटवणाऱ्या तीन तरुणांना वाशिम पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत बेड्या ठोकल्या आहेत. वाशिम जिल्हा न्यायालयाने तिन्ही आरोपींना २१ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काळे फेल येथील जय भवानी गणेश मंडळाच्या मूर्तींजवळ १७ सप्टेंबर रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास अश्लील व्हिडिओ प्रसारित करणारा क्यूआर कोड लावण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादी राम अर्जुन काळबांडे (रा. काळे फेल, वाशिम) यांच्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम २९९, ३५६ (३) बी सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) चे कलम ६७ आणि ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व वाशिम शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी चार पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सूक्ष्म पाहणी केली आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांची ओळख पटवली.
तिन्ही तरुण ताब्यात; गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये तनय शंकर मुठाळ (वय १९ वर्षे, रा. चिवरा, मालेगाव, ह. मु. मुकदम माधव नगर, वाशिम), शुभांग मोहन अजुबे (वय २८ वर्षे, रा. जवाहर नगर, वाशिम) आणि सागर सुनील भोयर (वय १८ वर्षे, रा. सावरगाव जिरे, जि. वाशिम) यांचा समावेश आहे.
या संशयितांनी सखोल विचारपूस केली असता त्यांनी सदर कृत्य केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर रोजी आरोपींना वाशिम जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक सायबर गुन्ह्यांची चौकशी होणार
या आरोपींनी अशा प्रकारचे क्यूआर कोड इतर कुठे चिकटवले आहेत का, तसेच याव्यतिरिक्त त्यांनी इतर काही सायबर गुन्हे केले आहेत का, या दृष्टीने पोलीस सध्या सखोल चौकशी करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय चौधरी करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुबोध कराळे व वाशिम शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिता वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक निकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोरले, पोलीस उपनिरीक्षक शेखर मारकड, पोलीस उपनिरीक्षक रवि सेबेवार, पोलीस हवालदार नितीन काळे, प्रशांत वाघमारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button