बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ऐतिहासिक गरुड मूर्तीचा शोध

१९८९ मधील छायाचित्राच्या आधारे शोधमोहीम; पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द, राजवाड्यात दर्शनी ठिकाणी ठेवली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

सिंदखेड राजा, दि. २० : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत सुमारे तीन दशकांपूर्वीच्या ऐतिहासिक नोंदीत आढळणाऱ्या गरुड मूर्तीचा शोध लागला आहे. शासकीय वाडा परिसरात कचऱ्याच्या ढिगाजवळ आणि पत्र्याच्या शेडलगत आढळून आलेली ही मूर्ती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून, सध्या ती श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव यांच्या राजवाड्यातील नगारखान्यात पर्यटकांना पाहता येईल अशा ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करणारे आर. सी. अग्रवाल यांनी सन १९८९ मध्ये प्रकाशित केलेल्या Archaeological Remains in Western India या पुस्तकात गरुड मूर्तीचा छायाचित्रासह संदर्भ नोंदविला होता. Agam Kala Prakashan, Delhi यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील छायाचित्रामुळे मूर्तीच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध झाला. मात्र, पुढील काळात ही मूर्ती प्रत्यक्षात कुठे आहे, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती.

याच संदर्भाचा मागोवा घेत सन २०२२ मध्ये इतिहास अभ्यासक व लेखक सुमित सुभाष खांदवे आणि मयुरेश अतुल खेकाळे यांनी मूर्तीचा शोध सुरू केला. पुस्तकातील छायाचित्र, उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ आणि स्थानिक माहिती यांच्या आधारे त्यांनी विविध ठिकाणी शोध घेतला. या प्रयत्नांना अखेर यश आले आणि शासकीय वाडा परिसरात कचऱ्याच्या ढिगाजवळ पत्र्याच्या शेडलगत ही मूर्ती आढळून आली. या शोधकार्याचा उल्लेख ‘माहेर जिजाऊंचे सिंदखेड राजा’ या पुस्तकातही करण्यात आला आहे.

सापडलेल्या गरुड मूर्तीची उंची ३०.५ इंच, रुंदी १५ इंच आणि जाडी १० इंच आहे. मूर्तीची सुरक्षितता आणि पुढील अभ्यासाच्या दृष्टीने ती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडे सोपविण्यात आली. विभागाचे उपसंचालक मयुरेश खडके यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना मूर्ती सुरक्षितपणे ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यानंतर कर्मचारी धीरज हांडे यांनी मूर्ती ताब्यात घेतली.

सध्या मूर्ती श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव यांच्या राजवाड्यातील नगारखान्यात दर्शनी ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राजवाड्यास भेट देणाऱ्या पर्यटकांना ही मूर्ती पाहता येत आहे. मूर्तीचा अभ्यास करून तिची ओळख व ऐतिहासिक माहिती नमूद करणारा माहितीफलक लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मूर्तीच्या मूळ स्थानाचा शोध तसेच तिच्या ऐतिहासिक संदर्भांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. पुढील अभ्यासानंतर ही मूर्ती ज्या विभागाच्या अखत्यारीत येते, त्या विभागाकडे ती सोपविण्यात येईल, अशी माहिती उपसंचालक मयुरेश खडके यांनी दूरध्वनीद्वारे दिल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी अतुल खेकाळे, इतिहास अभ्यासक सुमित सुभाष खांदवे, रफीक सैय्यद, विजय सोनुने, डॉ. सुभाष खांदवे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button