बदलाची दिशा दाखविणारे कर्तृत्व; तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या कार्याचे नगरसेविका दिशाताई खांडेभराड यांच्याकडून कौतुक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :देऊळगाव राजा तालुक्यातील प्रशासकीय कामकाजात सातत्य, शिस्त आणि लोकहिताला प्राधान्य देत काम करणाऱ्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या गतिमान कार्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्या या लोककल्याणकारी कामाची दखल घेतली जात असून, नगरसेविका दिशाताई खांडेभराड यांनी तहसीलदार डोंगरजाळ यांच्या प्रशासकीय कौशल्याचा गौरव करत “हे कार्य बदलाची दिशा दाखविणारे कर्तृत्व आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
देऊळगाव राजा तालुका हा ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून येथील रेती घाटांवरून होणारा अवैध रेती उपसा आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. हा प्रश्न वेळोवेळी चर्चेत आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत होता. या पार्श्वभूमीवर, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी तालुक्याचा पदभार स्वीकारल्यानंतर महसूल प्रशासनाला कमालीची शिस्त लावली.
विशेषतः तालुक्यातील अवैध रेती उपसा व वाहतुकीच्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. महसूल प्रशासनाने घेतलेली दक्षता, रात्रं-दिवस राबविलेली गस्त आणि धडक कारवाई यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे प्रशासनाने या विषयाकडे किती गांभीर्याने पाहिले आहे, याचे स्पष्ट चित्र आता तालुक्यात निर्माण झाले आहे.
तहसीलदार डोंगरजाळ यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे सर्वसामान्य जनतेचा शासकीय प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या याच शिस्तप्रिय आणि लोकहितैषी भूमिकेचे कौतुक करताना नगरसेविका दिशाताई खांडेभराड यांनी, तालुक्याला अशाच कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तहसीलदार डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग अधिक लोकाभिमुख काम करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



