पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन गावातील संपर्क तुटला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव (प्रतिनिधी)-सागर रावणचोरे
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागात मोठा हाहाकार माजवला आहे. शेगाव तालुक्यातील माटरगावजवळील पूल पावसामुळे वाहून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या पूल दुर्घटनेमुळे माटरगाव, बेलुरा आणि माटरगाव खुर्द या तीन महत्त्वाच्या गावांचा एकमेकांशी आणि परिसराशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. विशेष म्हणजे, ही घटना घडून तब्बल तीन दिवस उलटले तरी प्रशासनाने याकडे पूर्णपणे
दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पूल वाहून गेल्याने लहान मुलांचे शाळेत जाणे बंद झाले असून, आठवडी बाजारही पूर्णपणे कोलमडला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राणा दिलीपकुमार सानंदा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या
अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी सानंदा यांनी थेट बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त परिस्थितीची माहिती देत य नागरिकांसाठी तत्काळ पर्यायी रस्तात तयार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पंजाबराव देशमुख, मनोज वानखडे, विजय काटोले, नरहरीक टिकार गुरुजी, जुगलकिशोर गांधी, बेलुराचे सरपंच अनंता पाटील, स माटरगाव खुर्दचे सरपंच सिध्देश्वर बॉबटकार यांच्यासह तिनही य गावातील गावकरी उपस्थित होते.



