पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक; प्रशासनाचे दुर्लक्ष?

पीक कर्ज मिळण्यास आधीच विलंब; त्यात इतर बँकेत कर्ज नसल्याचे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्राची मागणी, अतिरिक्त खर्च आणि मानसिक त्रास
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा, दि. २२ : पीक कर्ज मिळण्यास विलंब होत असतानाच बँकेकडून विविध कागदपत्रांची पूर्तता आणि इतर बँकेत कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मागणी होत असल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नव्या हंगामासाठी शेतीची कामे सुरू असताना पीक कर्जासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीक कर्जासाठी इतर कोणत्याही बँकेत कर्ज नसल्याचे नमूद करणारे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र मागितले जात आहे. १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेतल्यानंतर त्यातील सुमारे १० रुपये शिल्लक राहतात, तर प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी सुमारे १०० रुपये अतिरिक्त खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय प्रतिज्ञापत्र तयार करणे, बँकेत कागदपत्रे सादर करणे आणि कर्जाच्या प्रक्रियेसाठी वारंवार ये-जा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. प्रवासासाठी सुमारे २०० रुपये खर्च होत असल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. दिवसभराचा वेळ बँकेच्या कामासाठी खर्च होत असल्याने शेतीची कामेही प्रभावित होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पीक कर्जासाठी आधीच विलंब होत असताना त्यात अशा अतिरिक्त प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप आहे. कर्जाची गरज असलेल्या शेतकऱ्याला वेळेत कर्ज उपलब्ध होण्याऐवजी कागदपत्रे, स्टॅम्प पेपर, प्रतिज्ञापत्र आणि बँकेच्या फेऱ्यांमध्ये वेळ जात असल्याने संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
एका बाजूला शासनाकडून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा असतानाच दुसऱ्या बाजूला नव्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम आणि पीक कर्ज या दोन्ही बाबींसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
इतर बँकेत कर्ज नसल्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्राची मागणी नेमक्या कोणत्या नियम अथवा आदेशानुसार केली जात आहे, याबाबत संबंधित प्रशासन आणि बँकांनी स्पष्टता देणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आवश्यक असल्यास तिची माहिती शेतकऱ्यांना स्पष्टपणे देऊन ती शक्य तितकी सुलभ करावी, अशी मागणी होत आहे.
पीक कर्ज हे हंगामी स्वरूपाचे असल्याने कर्ज मिळण्यास होणारा विलंब शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे पीक कर्जवाटपातील विलंब, अतिरिक्त कागदपत्रांची मागणी आणि त्यासाठी होणारा खर्च याबाबत संबंधित प्रशासन व सहकार विभागाने तातडीने लक्ष घालून वस्तुस्थितीची पडताळणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत जमा करण्याबरोबरच नव्या हंगामासाठी पीक कर्जही वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळविण्यासाठी अतिरिक्त खर्च, वारंवारच्या फेऱ्या आणि मानसिक ताण सहन करावा लागू नये, यासाठी संबंधित यंत्रणेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



