बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्री संजय सावकारे शेताच्या बांधावर

मलकापूरातील बेलाड आणि मोताळातील निपाण व शैलापुर येथे पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी; बाधित शेतकऱ्यांशी साधला संवाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. २१ : पावसातील मोठा खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला प्रतिकूल परिणाम यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी मलकापूर तालुक्यातील बेलाड व मोताळा येथील निपाणा व शैलापुर येथे शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

पावसातील खंडामुळे पिकांची झालेली अवस्था शेतकऱ्यांकडून जाणून घेताना राज्यमंत्री सावकारे यांनी प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची पाहणी केली. पिकांची वाढ, पाण्याची उपलब्धता तसेच अनियमित पावसाचा झालेला परिणाम याबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील पीक परिस्थिती व नुकसानीचा आढावा प्रशासकीय यंत्रणेकडून घेण्यात आला आहे. अकोला येथील कृषी विद्यापीठात कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही जिल्ह्यासह राज्यातील पीक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

पावसातील खंडामुळे मोठ्या क्षेत्रावरील पिकांवर परिणाम

पावसातील मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील सुमारे ७० ते ८० टक्के पिकांवर गंभीर परिणाम झाला असून, उर्वरित पिकांचे अस्तित्वही पुढील पावसावर अवलंबून आहे, असे त्यांनी सांगितले. वेळेवर पाऊस न मिळणे तसेच त्यानंतर झालेल्या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

मलकापूर व मोताळा तालुक्यासह जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आणि झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेऊन अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण पीक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आवश्यक तो दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन संजय सावकारे यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शासन व प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत असून, पीक नुकसानीबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार समाधान सोनोने, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button