पावसाचा दीर्घ खंड; मुक्ताईनगरात दुष्काळसदृश परिस्थिती! शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

मुक्ताईनगर : पावसाने दीर्घ खंड दिल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पिकांच्या निर्णायक वाढीच्या काळात पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप तसेच बागायती पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने केवळ कागदोपत्री आढावा न घेता प्रत्यक्ष शेतशिवारात उतरून परिस्थितीची पाहणी करणे आणि तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे.केळी, कापूस, मका, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तीळ यांसह विविध हंगामी व बागायती पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, मजुरी आणि सिंचनासाठी मोठा खर्च केला आहे. मात्र पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. खर्च वाढत असताना उत्पन्नाची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी अधिक तीव्र होत आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुक्ताईनगर तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील परिस्थितीची तातडीने पाहणी करून दुष्काळसदृश किंवा कोरडी परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणीनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनावश्यक अटी न लावता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच प्रलंबित पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने देण्यासोबतच चालू वर्षातील पीक विम्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.पंचनामे कागदावर नव्हे, शेतशिवारात व्हावेत!दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थितीचे वास्तव समजून घेण्यासाठी प्रशासनाची प्रत्यक्ष पाहणी महत्त्वाची आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांमध्ये आणि शेतशिवारांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ई-पिक पाहणीची प्रक्रिया देखील वेळेत पूर्ण करून पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.कर्जवसुलीला स्थगिती आणि सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठ्याची मागणीशेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कर्जमाफी करावी किंवा किमान कर्जवसुलीस स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, नादुरुस्त व अपुऱ्या क्षमतेच्या डीपी तातडीने दुरुस्त करणे आणि गरजेनुसार नवीन डीपी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.दुष्काळाचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित राहत नाही. त्याचा थेट परिणाम शेतकरी कुटुंबाच्या संपूर्ण अर्थकारणावर होतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवणेही अनेक कुटुंबांना कठीण होऊ शकते. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी आणि आवश्यक शैक्षणिक सवलती द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.जनावरांचा चारा आणि गावांच्या पाणीप्रश्नाकडेही लक्ष द्यावेपावसाचा खंड आणखी वाढल्यास जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पुरेशा प्रमाणात चारा व पाण्याची व्यवस्था करावी. तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठीही तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.प्रशासनासमोर आता निर्णयाचे आव्हानशेतकरी संकटात असताना पंचनामे, अहवाल आणि प्रस्तावांच्या प्रक्रियेत मदत लांबणीवर पडणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार ठरू शकतो. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्याची वस्तुनिष्ठ परिस्थिती तपासून विशेष आर्थिक मदतीसाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घेणे हीच काळाची गरज आहे.या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देताना ॲड. राहुल अशोक पाटील, तालुका प्रमुख मुक्ताईनगर; ॲड. देवेंद्र बोदडे, तालुका समन्वयक; ॲड. अशोक बोदडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख; अक्षय पालवे आणि वसीम मन्सुरी, तालुका संघटक आदी उपस्थित होते.‘बळीराजा वाचवा – शेतकरी वाचवा – शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!’ हा नारा देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.



