पाल येथे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा संकल्प’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

६५९ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ; भटके-विमुक्त नागरिकांसाठी विशेष मोहीम
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर
रावेर, दि. ३० सप्टेंबर २०२६ :
तालुक्यातील पाल येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ विशेष मोहीम राबविण्यात आली. या अभियानाला पालसह परिसरातील आदिवासी गावांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या विशेष शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार संजय तायडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, आगारप्रमुख श्री. मगरे, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, गणेश साळी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तळवी, विनोद झोपे, सिकंदर तडवी, सुरेश पवार, किसन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोमतीताई बारेला, धनसिंग पवार, डॉ. चिमणकर, प्रकाश पवार, चंद्रमणी तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध विभागांच्या योजनांची माहिती
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत दीपक नगरे यांनी महसूल, आदिवासी विकास, कृषी तसेच राज्य परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांना दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार संजय तायडे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना त्यांच्या गावातच मिळावा, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून उपलब्ध योजनांचा तसेच विविध प्रमाणपत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
६५९ लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ
अभियानादरम्यान एकूण ६५९ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये महसूल विभागामार्फत जिवंत ७/१२ उतारे ४८, विविध शैक्षणिक दाखले १५५, ग्रामपंचायत विभागामार्फत जन्म दाखले ११, आरोग्य विभागाच्या तपासणी शिबिरासह विविध योजनांचा १५० लाभार्थ्यांना लाभ, आभा कार्ड ४२, आयुष्मान कार्ड २७, वयोवंदना कार्ड ५, संजय गांधी योजनेअंतर्गत ४० लाभार्थी, अन्नसुरक्षा योजनेचे ९ फॉर्म तसेच रेशन कार्ड ई-केवायसीची प्रक्रिया करण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळामार्फत ७२ विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात आले. कृषी विभागामार्फत महिला शेतकऱ्यांना १०० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये पीएम किसान व फळबाग लागवड यांसारख्या योजनांशी संबंधित लाभांचा समावेश होता.
याशिवाय पिंपरकुंड येथे सुमारे ५७ रेशन कार्डांची प्रक्रिया करण्यात आली.
विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे परिश्रम
अभियानाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन निकम यांनी केले, तर आभार नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांनी मानले.



