बुलढाणामहाराष्ट्र

ओबीसी युवा महासंघाच्या आंदोलनाची दखल; विद्यार्थ्यांचे अर्ज आता ऑफलाइन स्वीकारणार

आधार, स्वयंम व वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी विभागाचा निर्णय; २३ सप्टेंबरच्या निषेध आंदोलनाला यश

खामगाव : प्रतिनिधी
जी.डी.रोकडे
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींची अखेर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दखल घेतली आहे. ऑनलाइन संकेतस्थळाच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आता ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.

या प्रश्नासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाला पत्र देऊन विद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी केली होती. तसेच ऑनलाइन संकेतस्थळ सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नसल्याची बाबही विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

मात्र त्यानंतरही संकेतस्थळाच्या समस्येवर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने २३ सप्टेंबर २०२६ रोजी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज बेलोकार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे जाहिरात पत्रक जाळून प्रशासनाच्या ऑनलाइन प्रणालीच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असताना संकेतस्थळ बंद असल्याने राज्यातील पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने हा प्रश्न आक्रमकपणे लावून धरत ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली होती.

अखेर या आंदोलनाची आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

“विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न असल्याने संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचा फटका कोणत्याही पात्र विद्यार्थ्याला बसू नये, ही आमची भूमिका होती. सचिन राजुरकर यांनी ३ सप्टेंबरलाच ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली होती. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही म्हणून २३ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. अखेर शासनाने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज बेलोकार यांनी व्यक्त केली.

पात्र विद्यार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज करावेत

दरम्यान, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना आणि वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी विभागाच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून ऑफलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी अर्जाची अंतिम मुदत, आवश्यक कागदपत्रे, अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या सूचनांची खात्री करून अर्ज वेळेत सादर करावा, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे ऑनलाइन प्रणालीतील अडचणींना पर्याय उपलब्ध झाल्याचे संघटनेने म्हटले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुढील काळातही प्रशासनाच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणार असल्याचे सुरज बेलोकार यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button