बुलढाणामलकापूरविदर्भसंपादकीय

पत्रकारांवर अरेरावी करून ‘तुला पाहून घेण्याची’ धमकी देणाऱ्या वादग्रस्त पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

मलकापूर : तिरंगा रॅलीचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराशी अरेरावी करून ‘तुला पाहून घेईल’ अशी धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मलकापूर पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकारांनी दिला आहे. यासंदर्भात मलकापूर पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले.
दि. १५ ऑगस्ट रोजी शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकार दीपक इटणारे घटनास्थळी उपस्थित होते. वृत्तसंकलनाचे कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांनी त्यांच्याशी अरेरावी केली आणि दमदाटीच्या स्वरात बोलत ‘तुला पाहून घेईल’ अशी धमकी दिल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. पत्रकाराने आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सार्वजनिक कार्यक्रमांचे वृत्तसंकलन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराशी पोलीस कर्मचाऱ्याने अरेरावी करणे, दमदाटी करणे किंवा धमकी देणे हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका मलकापूर पत्रकार संघटनेने घेतली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांच्यावर त्यांच्या गैरवर्तनाच्या स्वरूपानुसार नियमानुसार व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास पत्रकार संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. पत्रकारांना वृत्तसंकलन करताना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, पत्रकारांवर दबाव आणणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे.
या निवेदनावर पत्रकार अजय टप, कैलास काळे, करण झणके, शेख निसार, इलाही बक्ष, विजयकुमार वर्मा, मनोज पाटील, नागेश सुरंगे, नारायण पानसरे, शेख जमील, असित इंगळे, भिवा चोपडे, सतीश दांडगे, उमेश हिरुळकर, श्रीकृष्ण भगत, अनिल गोठी आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता उपविभागीय पोलीस अधिकारी या गंभीर प्रकरणाची कितपत दखल घेतात आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करतात, याकडे मलकापूरच्या पत्रकारांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button