नांदुरा पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहनसंशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
दैनिक -आवाज न्यायचा
प्रतिनिधी -प्रशांत चव्हाण
नांदुरा : गावातील सध्या वाढत असलेल्या संशयास्पद घटना, चोरी व घरफोडीच्या पार्श्वभूमीवर नांदुरा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घर, दुकान तसेच परिसराच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक, नांदुरा पोलिस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलिसांनी नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. १) घरातील मौल्यवान दागिने बँकेतील लॉकरमध्ये ठेवावेत.
२)घरात अनावश्यक रोख रक्कम ठेवू नये तसेच दैनंदिन खर्चासाठी लागणाऱ्या एवढ्याच पैशांची घरात व्यवस्था ठेवावी.
३)घराबाहेर रात्रीच्या वेळी दिवे सुरू ठेवावेत.
४)आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने घराबाहेर CCTV कॅमेरे बसवावेत.
५) बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी तसेच मुक्कामी बाहेर जाताना घरात मोठ्या प्रमाणात पैसे व दागिने ठेवू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
६) दिवसा गावात येणाऱ्या फेरीवाल्यांच्या हालचालींवर नागरिकांनी बारकाईने लक्ष ठेवावे. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी फेरीवाल्यांची विचारपूस करून त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
७)ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांनी रात्री आळीपाळीने गावात गस्त घालावी. गावात संशयित इसम आढळल्यास त्याला मारहाण न करता ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करावे.
८) तसेच गावातील बंद पडलेले पथदिवे नगरपरिषद व ग्रामपंचायतीने तातडीने सुरू करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेती साहित्य, गोठे, म्हशी तसेच शेतात असलेले साहित्य रात्रीच्या वेळी उघड्यावर ठेवू नये, अशीही सूचना पोलिसांनी केली आहे.
संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी तातडीने नांदुरा पोलिसांशी संपर्क साधावा.
नांदुरा पोलिस स्टेशन संपर्क : 07265-221028
पोलीस मदत क्रमांक : 112



