खडसे महाविद्यालय, संगणकशास्त्र विभागात “ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप” इंडक्शन कार्यक्रम संपन्न

खडसे महाविद्यालय, संगणकशास्त्र विभागात “ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप” इंडक्शन कार्यक्रम संपन्न
मुक्ताईनगर: श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागात विद्यार्थ्यांसाठी “ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप” या विषयावर इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ८ मार्च २०२५ करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. विजय सोनाने (पुणे) होते.कार्यक्रमादरम्यान श्री. विजय सोनाने यांनी आयटी क्षेत्रातील सध्याचे ट्रेंड्स, आवश्यक तांत्रिक कौशल्ये आणि विविध प्रोग्रामिंग भाषा यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात Python, Java, Java Script, C++, SQL आणि ए. आय. टूल यांसारख्या भाषांचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, क्लाउड कंप्युटिंग, सायबर सिक्युरिटी आणि डेटा सायन्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि ऑन जॉब ट्रेनिंगचे महत्त्व स्पष्ट करून, उद्योगात यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला.श्री. सोनाने यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले की C-Language ही संगणक शास्त्राची मूलभूत भाषा आहे. ऑपरेटिंग सिस्टम, एम्बेडेड सिस्टिम्स, आणि उच्च कार्यक्षमता संगणन (High-Performance Computing) यामध्ये C-Language चा मोठा वाटा आहे. तसेच, C-Language शिकल्याने इतर प्रोग्रामिंग भाषा शिकणे सोपे होते आणि लॉजिकल थिंकिंग सुधारते.संगणक शास्त्र विभागाने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगजगताचा अनुभव मिळतो आणि करिअर घडविण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.उपस्थितांनी श्री. विजय सोनाने यांचे मार्गदर्शन ऐकून अनेक शंका विचारल्या व उद्योग क्षेत्रातील संधींबाबत अधिक माहिती मिळवली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रंजना एस.झिंजोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. सौ. सीमा व्हि. राणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील प्रा.डॉ. सौ. व्ही. व्हि. चौधरी, प्रा. ए. एस. पाटील, प्रा. व्ही. पी. महाजन, इतर प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.



