पोलिसांचा वेढा भेदून तुपकरांची मंत्रालय परिसरात एन्ट्री, कार्यकर्त्यांसह येलो गेट पोलीस स्टेशन मुंबई येथे अटक व सुटका…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली- शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने बुधवारी मुंबईला चांगलेच हादरवून सोडले. सकाळपासून ‘आऊट ऑफ कव्हरेज’ असलेल्या तुपकरांनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदत कार्यकर्त्यांसहित गनिमी काव्याने थेट मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची मोठी दमछाक झाली असून अखेर तुपकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सकाळपासूनच मंत्रालयाला छावणीचे स्वरूप
तुपकरांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत धडक मोर्चाचे आवाहन केले होते. याची माहिती मिळताच मुंबई पोलिस सतर्क झाले होते. पहाटेपासूनच मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे शासकीय बंगले, आमदार निवास, मरीन ड्राईव्ह या सर्व परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. राज्यभरातून मुंबईत दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांना जागोजागी अडवून ताब्यात घेण्यात येत होते. या कारवाईत युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे,संचिन पांडोळे ,अमोल मोरे , अक्षय पाटील यांच्यासह अनेकांना सकाळीच ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांनी आंदोलनापूर्वी तुपकरांना कायदेशीर नोटीस बजावली होती. मात्र, “मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, २७ ला मुंबईत आंदोलन होणारच” अशी ठाम भूमिका तुपकरांनी घेतली होती.
कमी बंदोबस्ताचा मार्ग हेरत एन्ट्री
एवढा बंदोबस्त असतानाही तुपकरांनी पोलिसांना चकवा दिला. ज्या मार्गावर तुलनेने कमी पोलिस बंदोबस्त आहे, तो मार्ग हेरत ते अचानक मोजक्या कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने धडकले. तुपकर अचानक समोर आल्याने बंदोबस्तावरील पोलिसांची एकच धावपळ उडाली.
यावेळी तुपकर आणि कार्यकर्त्यांनी “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!” अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. आंदोलन पुढे जाऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तुपकरांना अनेक कार्यकर्त्यांसहित घेराव घालून ताब्यात घेतले आणि पोलिस वाहनात बसवून, येलो गेट पोलीस स्टेशन मुंबई येथे नेण्यात आले .तिथे हि सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून रात्री उशिरापर्यंत ठेवण्यात आले.संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांना येलो गेट पोलीस स्टेशन मध्ये आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर रात्री अटक झालेल्या कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.
नेमक्या मागण्या काय?
या आंदोलनामागे शेतकऱ्यांचे तीन मुख्य प्रश्न आहेत.
१. सरसकट कर्जमाफी: राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
२. प्रोत्साहन अनुदानात वाढ: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या दिले जाणारे ५० हजार रुपयांचे अनुदान तोकडे असून ते २ लाख रुपये करावे.
३. वंचितांना न्याय: यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेतून वगळल्या गेलेल्या आणि कर्जाचे पुनर्गठन केलेल्या पात्र शेतकऱ्यांना नव्या योजनेत तात्काळ समाविष्ट करावे.
राज्यात संतापाची लाट
मुंबईत आंदोलक नेत्यांना अटक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच ग्रामीण भागात, विशेषतः विदर्भात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लोकशाही मार्गाने मागण्या मांडणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप “क्रांतिकारीचे” युवा नेते अमोल मोरे यांनी केला असून, या अटकसत्रामुळे आंदोलन संपले नसून आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



