धरणगाव ग्रामपंचायतीच्या चौकशीला मुहूर्त कधी?

चौकशी समिती नेमल्याची चर्चा; मात्र प्रत्यक्षात कारवाई कुठे? पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष
मलकापूर : तालुक्यातील धरणगाव ग्रामपंचायतीसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित होत असताना संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमल्याचे सांगितले जात आहे. मात्र समिती नेमल्याचे सांगूनही अद्याप प्रत्यक्ष चौकशी, अहवाल किंवा पुढील कारवाईबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे “चौकशी समिती नेमली, पण चौकशी कधी होणार?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असताना प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे. मात्र चौकशीबाबत विलंब होत असल्याने मलकापूर पंचायत समिती प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकशी समिती खरोखरच नेमण्यात आली असेल, तर तिचे आदेश काय आहेत, समितीत कोणाचा समावेश आहे, चौकशी कधी सुरू झाली आणि आतापर्यंत काय निष्पन्न झाले, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देणे गरजेचे आहे.
दरम्यान, “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशी भूमिका प्रशासन घेणार नाही ना? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेऊन चौकशी पूर्ण करावी आणि वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आंदोलनाचा इशारा
चौकशी लवकरात लवकर सुरू करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संबंधितांकडून देण्यात आला आहे.
आता मलकापूर पंचायत समिती प्रशासन चौकशीला गती देणार की प्रकरण पुन्हा कागदोपत्रीच राहणार? याकडे धरणगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



