देशासाठी पुत्र गमावला, पण अभिमानाने उंचावले मस्तक; शहीद प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
अकोला:- ९ जून २०२६
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आईने स्वीकारला शौर्याचा सर्वोच्च सन्मान मोरगाव भाकरेसह जिल्हाभरातून अभिमानाची भावना
देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या मोरगाव भाकरेच्या वीर सुपुत्र शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ती चक्र या देशातील प्रतिष्ठित शौर्य सन्मानाने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या संरक्षण अलंकरण समारंभात द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान शहीद जवानाच्या आईंनी स्वीकारला. हा क्षण पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर हृदयात अभिमान दाटून आला.
६ जुलै २०२४ रोजी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रवीण जंजाळ यांनी अतुलनीय शौर्य, धाडस आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडविले. जीवाची पर्वा न करता त्यांनी शत्रूशी सामना केला आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या अद्वितीय पराक्रमाची दखल घेत भारत सरकारने त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करून त्यांच्या शौर्याला सलाम केला. समारंभात शहीद पुत्राचा सन्मान स्वीकारताना आईंच्या भावना अनावर झाल्या. एका बाजूला मुलाच्या विरहाचे दुःख, तर दुसऱ्या बाजूला त्याने देशासाठी दिलेल्या बलिदानाचा अभिमान-या दोन्ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. त्या क्षणी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिठी मारली, आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहून
उपस्थितांचे डोळेही पाणावले.
मोरगाव भाकरेसह संपूर्ण अकोला जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. गावातील नागरिक, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहीद जवानाला अभिवादन करत त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाला सलाम केला. गावातील प्रत्येक नागरिकाच्या ओठांवर आज एकच नाव आहे-प्रवीण जंजाळ. शहीद प्रवीण जंजाळ यांचे बलिदान हे केवळ एका कुटुंबाचे दुःख नसून संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. त्यांचे शौर्य, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना देशसेवेची प्रेरणा देत राहील. आईच्या कुशीत वाढलेला पुत्र मातृभूमीच्या कुशीत विसावला; पण त्याच्या शौर्याचा प्रकाश कायम भारताच्या इतिहासाला उजळत राहील……!



