देऊळगाव राजा येथे २३ वर्षीय तरूणाची घरातच गळफास लावून आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :येथील जुना जालना रोडवरील काकड हॉस्पिटलच्या वर भाड्याने राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश्वर अभय जाधव (वय २३ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (मर्ग) नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत योगेश्वर हा मूळचा पोपळ शिवणी (ता. सिंदखेड राजा) येथील रहिवासी असून सध्या तो कुटुंबासह देऊळगाव राजा येथील जुना जालना रोडवरील काकड हॉस्पिटलच्या वर राहत होता. शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास योगेश्वर याने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती त्याचे वडील अभय मोतीराम जाधव (वय ५२ वर्ष, रा. पोपळ शिवणी, ह.मु. देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी कायमी मर्ग क्र. ३६/२०२६, कलम १९४ बीएनएसएस (BNSS) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री 9:५२ वाजता मर्ग दाखल करून घेतला.
पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गिते , या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तरुण मुलाच्या अशा अचानक जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



