बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दिवसाढवळ्या घरफोडी! पिंपळगाव चिलमखाँ येथे लोखंडी पेटी फोडून ५८ हजारांचा ऐवज लंपास; देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:तालुक्यातील पिंपळगाव चिलमखाँ येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून घरातील कपाट व लोखंडी पेटीतील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव चिलमखाँ येथील रहिवासी व शेतकरी भानुदास शामराव खांडेभराड (वय ६०) यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. ही चोरीची घटना ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी घराला कुलूप लावून शेतात गेले असता, अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्याने घरातील कपाट तसेच लोखंडी पेटीचे कुलूप तोडून आत ठेवलेले ४६ हजार रुपये रोख, सुमारे २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (किंमत अंदाजे १० हजार रुपये), तसेच लहान मुलांचे चांदीचे वाळे, हातातील कडे आणि अंगड्या असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

भानुदास खांडेभराड यांच्या तोंडी तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कायमी अप नंबर ४०४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची नोंद पोहेका भास्कर सानप यांनी केली असून, पुढील तपास पोहेका संजय गोरे करीत आहेत.

दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button