तेल्हारा शहरात काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ! अकोला जिल्ह्यासह तेल्हारा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांच्या हिताकारीता काँग्रेस पक्षाच्या विविध मागण्या.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
विजय मनोहरराव घोडे अकोला जिल्हा
दि. १६ सप्टे. २०२६
| तेल्हारा शहरात नगर परिषद समोर शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तेल्हारा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामध्ये काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यां करिता असंख्य मागण्या तेल्हारा तहसीलदार यांच्यामार्फत शासनास केल्या.
मागील तब्बल ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह विविध पिके पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तेल्हारा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन देत तेल्हारा तालुकासह अकोला जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी रू. ५० हजार आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. बुधवार दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यानंतर आता ऐन सोयाबीन चे शेंगा भरणेच्या काळात तब्बल ४५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे तसेच मशागतीवर मोठा खर्च केला आहे. मात्र ऐन पीक वाढीच्या काळात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेस कडून विविध मागण्या
निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या असून यामध्ये प्रामुख्याने तेल्हारा तालुका तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
तालुक्यातील सर्व गावांमध्ये तातडीने पीक पाहणी व पंचनामे करावेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टर ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.
पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत तातडीने कर्जमाफी अथवा कर्ज पुनर्गठनाचा निर्णय घ्यावा.
शासनाने कागदी अहवाल व पंचनाम्यांच्या विलंबात न अडकता प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत असून शासनाने या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने मदत द्यावी.
त्यावेळी प्रदेश काँग्रेस महासचिव ॲड. महेश गणगणे, प्रदेश महिला नेत्या डॉ. संजीवनी ताई बिहाडे, जिल्हा परिषद सदस्य गजाननराव काकड, ज्येष्ठ नेते डॉ अशोकराव बिहाडे, जिल्हा महासचिव प्रशांत देशमुख, प्रकाशराव वाकोडे, मोहनराव अंजनकर, अतुलजी ढोले, ता. अध्यक्ष गजानन वानखडे, शहर अध्यक्ष ॲड. संदीप देशमुख, प्रकाश राऊत, हुकुमचंदजी शर्मा, नरेंद्र सुईवाल, फिरोज खान पठाण, शेख जाकीर, अब्दुल हमीद, शेख निसार, विजय जायले, अन्सार पटेल, अनंत सोनमाळे, नितीन वाकोडे, नुसरत खान, संजय धुरंदर, दीपक निकाडे, महिला काँग्रेसच्या रजियाताई पटेल, सुशिलाताई घुगे, सुरेश कुकडे, भानुदास वाघोडे, शंकरराव कुंडे, दिनेश मावशे, विलास काळबांडे, शफाकत खा, अनंता दही, बालकिसन भड, निलेश जवंजाळ, गणेश बोदडे, हेमंत नागपुरे, प्रशांत नागपुरे, विश्र्वदीप पाटोळे, सदाशिव वाघ, प्रकाश उगले, प्रमोद इंगळे, सुभाष डांगे, सतीश बिहाडे, तसेच काँग्रेसचे नेते ,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



