खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन; वीर लहुजी गणेशोत्सव मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूक ठरली आदर्श!

विजय मनोहरराव घोडे
आवाज न्यायाचा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
दि २८ सप्टेंबर
तेल्हारा | प्रतिनिधी
जय भवानी चौक, तेल्हारा येथील वीर लहुजी गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून सामाजिक बांधिलकी आणि कायद्याचा आदर यांचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे दि. २७ सप्टेंबर रोजी समाजाला अपेक्षित पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, विसर्जन मिरवणुकीत डीजे, मॉडिफाइड वाहने, मोठ्या आवाजाचे स्पीकर अथवा भडक विद्युत रोषणाईचा वापर टाळण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या साथीने अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत मिरवणूक काढण्यात आली.
सध्याच्या काळात अनेक ठिकाणी ध्वनिप्रदूषण तसेच मिरवणुकीतील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. अशा परिस्थितीत वीर लहुजी गणेशोत्सव मंडळाने घेतलेली भूमिका विशेष उल्लेखनीय ठरत आहे. उत्सव साजरा करताना श्रद्धेबरोबरच सामाजिक जबाबदारी, पर्यावरणाची काळजी आणि न्यायालयीन निर्देशांचा सन्मान करता येतो, हे या मंडळाने कृतीतून दाखवून दिल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
विशेषतः मातंग समाजातील या मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात नवा आदर्श आणि सकारात्मक पायंडा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा तेल्हारा परिसरात सुरू आहे. पारंपरिक वाद्यांच्या साथीने निघालेली विसर्जन मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि गणेशभक्तांकडून कौतुक होत असून, शासन व प्रशासनाने अशा अनुकरणीय गणेशोत्सव मंडळांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही पुढे येत आहे.
सन २०२६ मधील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ व आदर्श विसर्जन मिरवणूक म्हणून वीर लहुजी गणेशोत्सव मंडळाचा गौरव करण्यात यावा, तसेच प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, सत्कार आणि पारितोषिक देऊन मंडळाच्या कार्याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
“उत्सवही आनंदाचा आणि नियमांचाही सन्मान” असा संदेश देत वीर लहुजी गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साजरा केल्याने त्यांच्या उपक्रमाची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button