तेल्हारा ब्रह्माकुमारीज् मार्फत २५ ऑगस्ट ला रक्तदान शिबीर. भारतासह नेपाळमध्ये ६००० सेवा केंद्रा मार्फत राबवल्या जाणार रक्तदान शिबिरे

तेल्हारा वासियांनी रक्तदान अभियानात सहभागी होण्याचे प्रमिला दीदींचे आवाहन
ब्रह्माकुमारीज रक्तदानासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणार.
माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त अभियान राबविण्यात येणार
तेल्हारा/ अकोला जिल्हा प्रतिनिधी :-
ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी (२५ ऑगस्ट २०२५) व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे भारतासह नेपाळात रक्तदान महाअभियान राबवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे. या महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथुन केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचे कडुन झाला असुन राष्ट्रीय शुभारंभानंतर भारत व नेपाळात रक्तदान शिबिरांना सुरुवात होईल. त्यानंतर देशभरातील सहा हजारांहून अधिक सेवा केंद्रांवर एकाच वेळी दि. २२, २३, २४ आणि २५ ऑगस्ट रोजी विशाल रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. या अभियानांतर्गत एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे.
समाज सेवा प्रभागाचे राष्ट्रीय संयोजक बी. के. अवतार भाई यांनी सांगितले की, ब्रह्माकुमारीजच्या समाज सेवा प्रभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या महाअभियानासाठी भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, जिल्हा रक्तपेढी, जिल्हा सरकारी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, रोटरी इंटरनॅशनल क्लब, लायन्स क्लब, आयएसबीटीआय यांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर रक्तदान शिबिरे घेतली जातील.
एक लाख युनिटसह वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न!
या रक्तदान महाअभियानांतर्गत एक लाख युनिट रक्तदानाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने ब्रह्माकुमारीज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करणार आहे. हा पहिलाच प्रसंग आहे की एखाद्या आध्यात्मिक संस्थेमार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान अभियान राबवले जात आहे. जागतिक विक्रमसाठी तयारी पूर्ण झाली आहे.
स्थानिक तेल्हारा ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत रक्तदान कार्यक्रम
ब्रह्मा कुमारीज सेवा केंद्र तेल्हारा. येथील स्थानिक सेवाकेंद्रामार्फत रक्तदान कार्यक्रम दि.२५ ऑगस्ट, २०२५ सोमवारी स्थानिक ब्रह्मा कुमारीज सेवा केंद्र येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत राबविण्यात येणार असल्याचे सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांनी कळविले आहे.



