आमदार गिरीश महाजन यांच्या कथित जातीवादी वक्तव्याचा बोदवडमध्ये निषेध; पँथर सेनेचे पोलिस ठाण्यात निवेदन

बोदवड (प्रतिनिधी) — जळगाव जिल्हाध्यक्ष लखनभाऊ पानपाटील यांच्या आदेशानुसार आज बोदवड येथे जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांनी केलेल्या कथित जातीवादी वक्तव्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी आमदार गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बोदवड पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.काल जामनेर तालुक्यात घडलेल्या घटनेत आमदार गिरीश महाजन यांनी जातीवादी वक्तव्य केल्याचा आरोप पँथर सेनेने केला असून, हे वक्तव्य सामाजिक सलोख्यास बाधा आणणारे आणि संविधानविरोधी असल्याचा ठपका संघटनेने ठेवला आहे. या प्रकारामुळे दलित, वंचित व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.निवेदन देताना ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जातीवादाला थारा देणार नाही”, “संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देत उपस्थितांनी आपला संताप व्यक्त केला.यावेळी बोलताना पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांवर कुणीही आघात केल्यास पँथर सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.या आंदोलनाच्या वेळी“जय भीम, जय पँथर”,“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”,“ऑल इंडिया पँथर सेनेचा विजय असो”अशा घोषणा देत संघटनेने एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.



