तरुणाच्या हत्या प्रकरणाचा पाच तासांत छडा; चार संशयित जेरबंद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
किनगाव राजा : तढेगाव शिवारातील सोयाबीनच्या शेतात मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची ओळख पटवून त्याच्या हत्या प्रकरणाचा अवघ्या पाच तासांत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले असून, जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
उमेश रमेश परिहार (वय ३८, रा. साकेगाव) हा ९ सप्टेंबर रोजी मुलांना भेटण्यासाठी मडाखेड येथे गेला होता. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी तढेगाव शिवारातील रस्त्यालगतच्या सोयाबीनच्या शेतात तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या चेहऱ्यावर सूज, नाक व तोंडातून रक्तस्राव तसेच डोक्याला दुखापत झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी मृतकाचे वडील रमेश परिहार यांनी दिलेल्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. भौतिक तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे मृतकाची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत चार संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृतक उमेश परिहार आणि संशयित गणेश राजपूत यांच्यात पूर्वीपासून वाद होते. या वादातून उमेश याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गणेश राजपूत याने सागर पवारच्या माध्यमातून नयीमखाँ पठाण आणि गणेश काळे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर उमेशला सोबत घेऊन लोणार येथे नेण्यात आले. तेथे जेवण केल्यानंतर त्याला मद्य पाजण्यात आले आणि त्यानंतर विषारी पदार्थाच्या माध्यमातून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. मृतदेह तढेगाव शिवारातील शेतात टाकण्यात आल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात गणेश मोतीसिंग राजपूत (३९, रा. उतरादा), गणेश पुंजाजी काळे (४२, रा. सारस्वती), नयीम खाँ उमर खाँ पठाण (५०, रा. ईसोली) आणि सागर प्रकाश पवार (५०, रा. उतरादा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.



